सासुरे येता घरा, वाढे ‘सौं’चा तोरा!

Panchnama
Panchnama

गंपरवा बाबा येणार आहेत.’ मोबाईल बंद करून स्वयंपाकघराकडे पाहत आम्ही म्हटले.
‘क्का ऽऽऽय ! गेल्या वर्षी तर आले होते. चांगले तीन दिवस राहिले होते. मी काय काय सांभाळू? मुलं सांभाळू? तुम्हाला सांभाळू? घर सांभाळू ? का बाबांना सांभाळू?’ त्रागा करीत बायकोने म्हटले.
‘अगं तू फक्त जीभ सांभाळ. सगळं व्यवस्थित होतंय.’ याही परिस्थितीत आम्ही टोमणा मारला.

‘हे बघा, कतरिना यंदा दहावीला आहे. तिचा अभ्यास घेता घेता माझ्या नाकी नऊ येतात. त्यातच माझी कंबरदुखी..आऽऽई गं.ऽऽऽ. आता काय मी जगत नाही.’ असे म्हणून कंबरेवर हात ठेवत डोळ्यातून पाणी काढले. अनेकदा वाटतं, की बायको काय नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून शिकून आली आहे काय? तिच्यासारखी ‘ड्रामा’बाजी तर कसलेल्या अभिनेत्यालाही जमणार नाही.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘अगं माझे बाबा येणार नाहीत. तुझे बाबा येणार आहेत.’’ आम्ही असं म्हटल्यावर तिच्या चेहऱ्यावरील भाव झरझर बदलले. कपाळावरच्या आठ्यांची जागा कौतुकाने घेतली. ‘अगं बाई ! बाबा येणार आहेत होय? तीऽऽन महिन्यांनतर पहिल्यांदाच येत आहेत. मागच्या वेळी त्यांना पाहुणचार कमी पडला होता. आता त्यांना महिनाभर येथून हलूनच देणार नाही. तुम्ही आता ऑफिसला रजा टाका. आपण पाहुणचारात कुठे कमी पडायला नको.’ बाबांना हे आवडते, ते आवडत नाही, असे म्हणून तासभर तिने ‘बाबापुराण’ चालू केले.

‘अहो मागच्या वेळी बाबांना टीव्हीवर क्रिकेटची मॅच बघताना फार त्रास झाला. कोण ‘फुटबॉल’ मारतोय, हेच त्यांना कळत नव्हते. त्यामुळे पहिल्यांदा ते टीव्हीचं खोकं भंगारात टाका आणि चांगला एलसीडी घ्या.’ आम्ही लगेचच चाळीस हजारांचा हप्त्यावर टीव्ही आणला. त्यानंतर सोफ्याचे कव्हर बदलण्याचा आदेश निघाला. आम्ही त्याचीही अंमलबजावणी केली. बाबांसाठी स्वतंत्र बेड आणायला सांगितला. आम्ही कर्ज काढून तोही आणला.
‘अहो, हे घर फारच जुनं झालंय. बाबांना येथं राहायला कसंच तरी होतं.’ बायकोने नवीन मागणी केली.

‘अगं पण दोन दिवसांत नवीन घर कसं घेणार? आणि त्यासाठी किमान चाळीस-पन्नास लाख लागतील, ते कोठून आणणार? काहीतरी लॉजिकली बोलत जा ना.’ आम्ही आवाज चढवत म्हटलं.    
‘माझ्या बाबांपेक्षा तुम्हाला पैसाच महत्वाचा वाटणार? एक नवीन घर घ्या म्हटलं तर तुमच्या जीवावर येतंय. मी दिवस-रात्र राब राबतेय, ते दिसतंय का कोणाला’? बायकोनं डोळ्यातून पाणी काढलं. 
‘अगं घर घेणं म्हणजे काय चप्पल, साडी खरेदीसारखं सोपं आहे का?’ आम्ही नरमाईने म्हटलं. त्यावर तीही वरमली. 

‘ठीक आहे, नवीन घर घेऊ शकत नाही तर किमान घराला रंगरंगोटी तरी करा. बाबांना येथे राहण्यात समाधान वाटलं पाहिजे.’ बायकोची ही मागणी आम्ही मान्य केली. दुसऱ्या दिवशी सकाळी रंगाऱ्यांच्या गाठीभेटी घ्यायला सुरुवात केली; पण कोणीही तातडीने कामाला यायला तयार नव्हते. आम्ही चार-पाच हजार रुपये जादा द्यायला तयार झालो; पण सगळ्यांनी नकार दिला. ही अडचण आम्ही बायकोला सांगितली. त्यावर ‘मग तुम्हीच रंगकाम करा की. नाहीतर तुम्ही रजेवरच आहात.’ असे म्हटले. मग नाईलाजाने आम्ही मार्केटमध्ये जाऊन रंगांचे डबे घेऊन आलो. ‘‘हे बघा, दोनच दिवसांत काम उरका. बाबा आल्यानंतर त्यांच्यासमोर पसारा नकोय.’ बायकोने दम भरला. सध्या आम्ही दिवस-रात्र अजिबात विश्रांती न घेता रंगकाम करतोय.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com