सय्यदभाई आणि डॉ. गंगाखेडकर या दोन पुणेकरांना पद्मश्री!

Padma-Shri
Padma-Shri

पुणे : मुस्लिम सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून मुस्लिम धर्मातील अनिष्ट रुढी, परंपरांविरुद्ध आवाज उठवितानाच मानवतेलाच खरा धर्म मानणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सय्यद मेहबुबह शाह कादरी उर्फ सय्यदभाई तसेच एडस्‌ व अन्य संसर्गजन्य आजारांवर मुलभूत संशोधन करणाऱ्या डॉ.रमण गंगाखेडकर यांना 'पद्मश्री' सन्मान जाहीर झाला आहे. 

प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला पद्म पुरस्कारांच्या यादीमध्ये सय्यदभाई व डॉ.गंगाखेडकर यांची नावे जाहीर झाल्यानंतर त्यांचे कुटुंबीय व कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. सय्यदभाई यांनी मुस्लिम धर्मातील तलाक पद्धती संपुष्टात आणणे, मुल दत्तक घेण्यास संमती देणे यांसारख्या विविध प्रश्‍नांवर 1955 पासून काम सुरू केले. हमीद दलवाई यांच्यासमवेत पुण्यात मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना करुन या चळवळीला व्यापक स्वरुप दिले. पुढे दलवाई यांच्या निधनानंतर सय्यदभाई यांनीच चळवळीची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन आपले कार्य सुरूच ठेवले.

मुस्लिम धर्म लग्न झालेल्या स्त्रीयांना समान न्याय देत नाही, तलाकची तलवार स्त्रीयांच्या खांद्यावर रोखलेली असते. देशभरातील तलाकपिडीत महिलांचे प्रश्‍न समजून घेत त्याविरुद्ध सत्याग्रही पद्धतीने संघर्ष उभा केला. तलाकबंदी कायदा निर्माण करण्याबरोबरच समान नागरी कायदा मानवी मुल्यांवर आधारीत करा, यासाठी त्यांनी कायम आग्रह धरला. वयाच्या 83 व्या वर्षीही त्यांनी आता 'बलात्कारमुक्त भारत अभियान' सुरू केले आहे. 

एड्‌स आणि संसर्गजन्य आजारावर मूलभूत संशोधन करणारे डॉ. गंगाखेडकर हे भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेच्या 'साथीचे आणि संसर्गजन्य रोग' या विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. पुण्यातील गाडीखाना रुग्णालयात 1996 मध्ये कार्यरत असताना त्यांनी 'महिलांमधील एड्‌सचा संसर्ग' याविषयी शोधनिबंध प्रसिद्ध केला. या शोधनिबंधावर जगभरात एड्‌स प्रतिबंधक कार्यप्रणाली निश्‍चित करण्यात आली.

तसेच त्यांनी 1998 मध्ये आईकडून मुलाकडे एड्‌सचे होणारे संक्रमण याविषयी महत्वपुर्ण संशोधन केले. त्यांच्या संशोधन व वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांच्या संशोधनाला जगभर मान्यता मिळाली. डॉ.गंगाखेडकर यांनी औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पदवीचे, अमेरीकेतील जॉन हाफकीन इन्स्टिट्युटमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. 

''पद्मश्रीद्वारे आत्तापर्यंत केलेल्या कामाबद्दल आदर व्यक्त झाला आहे. आम्ही लढवय्ये असून अन्यायाविरुद्ध आवज उठविणारे आहोत. धर्मापेक्षा मानवतावाद टिकला पाहीजे. एका धर्माची नाही, तर एका विचारांची माणसे एकत्रीत येऊन एक चांगला समाज घडण्याची गरज आहे.''
- सय्यदभाई

''महिला व बालकांमध्ये संक्रमीत होणाऱ्या एसड्‌संबंधीचे संशोधन मला करता आले. पद्मश्री सन्मानामुळे आपण केलेल्या कष्टाची कुठेतरी दखल घेतली जात आहे, असे वाटले. एडस्‌ जनजागृतीसाठी कार्य करणाऱ्या संघटनांच्या पाठींब्यामुळेच हे घडू शकले.''
- डॉ. रमण गंगाखेडकर, वैद्यक शास्त्रज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com