शेतकरीपुत्राच्या संशोधनाला मिळालं पेटंट; आता रस्ता अन् पर्यावरणही सुधारणार!

Prof_Yogesh_Nigade
Prof_Yogesh_Nigade

सोमेश्वरनगर (पुणे) : येथील सोमेश्वर इंजिनिअरिंग कॅालेजचे प्रा. योगेश निगडे यांना पेटंट मिळाले आहे. रस्ता तयार करताना 'कॉम्पॅक्टींग' करण्यासाठी केवळ पाणी वापरून रोलर फिरविला जातो. त्याऐवजी पाण्यामध्ये वीस टक्के स्पेंट वॅाश मिसळला, तर रस्त्याची लोड बेअरिंग कॅपॅसिटी अनेकपटींनी वाढते, हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केले आहे. यामुळे प्रामुख्याने रस्त्याचा दर्जा आणि क्षमता तर वाढणारच आहे, पण पर्यावरणाला घातक ठरत असलेल्या स्पेंट वॅाशची विल्हेवाट लावण्याची कटकटही मिटणार आहे.

सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सोमेश्वर इंजिनिअरिंग कॅालेजमध्ये योगेश निगडे हे सिव्हिल विभागाचे प्राध्यापक आहेत. पुरंदर तालुक्यातील गुळुंचे या छोट्या गावचे असून त्यांनी माळेगाव इंजिनिअरिंग कॅालेजला शिक्षण पूर्ण केले आहे. सोमेश्वर कॅालेजमध्ये विद्यार्थ्यांना प्रकल्प, संशोधन हे शिकवत असताना स्वतःही त्याकडे ओढले गेले. त्यांचे काही शोधप्रबंधही राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रसिद्ध झाले आहेत.

त्यांनी रस्त्याचा दर्जा वाढविण्याच्या हेतूने सोमेश्वर कॅालेजच्या सॅाईल इंजिनिअरिंगच्या सुसज्ज प्रयोगशाळेत दहा फूट रस्ता तयार करून त्यावर वेगवेगळे प्रयोग केले. प्रयोगानंतर रस्त्याचे नमुने घेऊन विविध खासगी, सरकारी प्रयोगशाळांमध्ये त्याच्या चाचण्याही केल्या. त्याचा अभ्यास त्यांनी वेल्लोर (तामिळनाडू) येथील व्हीआयटी या प्रतिष्ठीत सरकारी महाविद्यालयात झालेल्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात मांडला. तिथे प्रयोगाचे कौतुक झाल्यानंतर त्यांनी आणखी चाचण्या केल्या.

यानंतर प्रयोगात यश मिळाल्याची खात्री झाल्यावर त्यांनी कंट्रोलर जनरल ऑफ पेटंट, डिजाईन अँड ट्रेड मार्क या सरकारी संस्थेकडे पेटंटचा प्रस्ताव दाखल केला. नुकताच तो मंजूर झाला आहे. वरीष्ठ संशोधक चंद्रशेखर शेंडकर यांच्यानंतर पेटंट मिळविणारे ते परिसरातील दुसरेच व्यक्ती आहेत. त्यांना दिनेश काटे, चिन्मय नाईक यांचे सहकार्य लाभले तर डॉ. बी. के. सरकार यांनी मार्गदर्शन केले.

'सोमेश्वर'चे प्राचार्य संजय देवकर म्हणाले, 'दर्जासाठी हल्ली रस्ताबांधणीत सिमेंटचा वापर होतोय. या प्रयोगामुळे तो कमी करून देशाची आर्थिक बचत होऊ शकेल. पर्यावरणाच्या समतोलात भूमिका बजावता येईल. केंद्र व राज्य सरकारच्या होकल फॉर लोकल या मोहिमेला पूरक असे हे संशोधन आहे.' 

संशोधन काय सांगते?
रस्त्याचे विविध थर असतात. मातीच्या, कामाच्या प्रकारानुसार थर बदलतात. सर्वात वरच्या 'वेअरिंग कोट'च्या खाली सबबेस लेयर असतो. पाणी टाकून रोलरव्दारे त्यावेळी कॉम्पॅक्टींग केले जाते. या कॉम्पॅक्टींगच्या वेळी पाण्याऐवजी स्पेंट वॅाश वापरण्याची शिफारस निगडे यांनी केली आहे. स्पेंट वॅाशमिध्ये मेलॅनोडीन सारखे चिकट घटक असतात. वीस टक्के स्पेंट वॅाश वापरला तर रस्त्याची भार सहन करण्याची क्षमता (लोड बेअरिंग कपॅसिटी) पंचवीस ते तीस टक्क्यांनी वाढते. यामुळे रस्त्याच्या क्षमतेसोबत रस्त्याचे आयुष्य व दर्जाही वाढणार आहे. पन्नास टक्क्यांच्या पुढे स्पेंट वॅाश वापरणे मात्र रस्त्यासाठी हानिकारक ठरते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

पर्यावरणपूरक संशोधन
स्पेंट वॅाश हा साखर कारखान्यातून बाहेर पडणारा टाकाऊ पदार्थ आहे. त्याच्या वापराने जमीन, पाणी, हवा दूषित होत आहे. त्याची विल्हेवाट लावणे हे कारखान्यांपुढे आव्हान असते. ते शेतात टाकणे, नदीत सोडणे असे गैरप्रकारही होतात. त्यामुळे स्पेंट वॅाश रस्त्यासाठी वापरले तर देशातील रस्ते तर सुधारतीलच, पण पर्यावरणाची हानीदेखील टळणार आहे. त्यामुळे एका शेतकरीपुत्राच्या संशोधनाचे कौतुक होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com