शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच...सोयाबीनचे बी उगवलेच नाही  

farmer
farmer

आळेफाटा (पुणे) : खरीप हंगामात पेरलेल्या सोयाबीन बियाण्याची उगवण न झाल्याच्या जुन्नर तालुक्‍यातील अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी असून, संबंधित बियाणे कंपनीकडून फसवणूक झाल्याची फिर्याद सरकारचा प्रतिनिधी म्हणून जुन्नरचे तालुका कृषी अधिकारी सतीश शिरसाठ यांनी गुरुवारी आळेफाटा पोलिस ठाण्यात दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृषी अधिकारी सतीश शिरसाठ यांनी फिर्याद दिली असून, तिचे पुण्यातील चतुःश्रुंगी पोलिसांकडे हस्तांतर केले आहे. शिरसाठ हे कृषी निविष्ठा गुणवत्तेचे संनियंत्रण व निरीक्षक म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहेत. संबंधित बियाणे कृषीधन प्रा. लि., जालना या कंपनीचे असून, कंपनीने सोयाबीनच्या केएसएल 441 या वाणाची या हंगामात मोठ्या प्रमाणावर विक्री केली आहे. मात्र, बियाण्याची उगवण न झाल्यामुळे जुन्नर तालुक्‍यातील आर्वी, पिंपळगाव तर्फे नारायणगाव, आपटाळे, घोगरेवाडी, कोंबरवाडी, नळावणे, निरगुडे, आगर, गोळेगाव, बेल्हे या गावांतील 32 शेतकऱ्यांनी तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीकडे तक्रार केली आहे. 

या तक्रारीनुसार समितीचे अध्यक्ष, तालुका कृषी अधिकारी सतीश शिरसाठ, सचिव कृषी अधिकारी विजय खेडकर, सदस्य, नारायणगावच्या कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ तज्ज्ञ दत्तात्रेय गावडे, मंडल कृषी अधिकारी अनिल गंभीरे यांच्या समितीने पंचनामे केले. त्यावेळी पेरणी केलेल्या सोयाबीनची सरासरी 15 ते 30 टक्के उगवण आढळून आली. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले असून, त्यांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे कंपनीविरुद्ध आळेफाटा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास चतुःश्रुंगी पोलिस करत आहेत. 

"सर्वेक्षण करून बियाणे पुन्हा देणार' 
सोयाबीन बियाण्याबाबतच्या तक्रारीनुसार, कृषीधन प्रा. लि. कंपनीकडून प्रत्यक्ष सर्वेक्षण करत आहोत. शक्‍य असेल तेथे शेताची प्रत्यक्ष पाहणी करून बियाण्यात दोष असल्यास, संबंधित शेतकऱ्यांना स्थानिक दुकानदारांच्या माध्यमातून सरकारच्या निर्देशांनुसार आम्ही पुन्हा बियाणे उपलब्ध करून देत आहोत, असे कंपनीचे पुणे विभागीय अधिकारी गणेश सोनवणे यांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com