पुण्यात देहविक्री करणा-या महिलांसाठी विशेष उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

  • पुस्तकांची आवड निर्माण होण्यासाठी सहेली संघ व मैत्र युवा फाउंडेशनचा उपक्रम

पुणे : देहविक्री करणा-या महिलांचा मानसिक विकास व्हावा, त्यांचे विचार परिवर्तन व्हावे आणि त्यांच्यात पुस्तकांची आवड निर्माण व्हावी या उद्‌देशाने सहेली संघ संस्था आणि मैत्र युवा फाउंडेशनने वेश्‍यावस्तीतील महिलांसाठी "विचारांची पुस्तकपेटी' हा उपक्रम राबवीत आहे. विविध भाषेतील पुस्तके या उपक्रमाच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात येणार आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उपक्रमाचे उद्‌घाटन रविवारी (ता.1) दुपारी एक वाजता बुधवार पेठेतील सार्वजनिक काका सभागृहात होणार आहे. शिक्षणतज्ज्ञ व साहित्यिक न. म. जोशी यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सहेली संघच्या संचालिका तेजस्वी सेवेकरी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. मैत्र युवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संकेत देशपांडे, सहेली संघाच्या मंदाकिनी भदाणे, महादेवी मदार आदी यावेळी उपस्थित होते. बुधवार पेठेतील वेश्‍यावस्तीमध्ये सध्या सुमारे दीड हजार महिला आहेत. त्यामध्ये मराठी, हिंदी, बंगाली आणि तमीळ भाषा बोलणा-या व वाचू शकणा-या महिलांचा समावेश आहे. या सर्वांना त्यांच्या भाषेतील पुस्तके उपलब्ध करून दिली जातील. महिन्यातून दर 15 दिवसांनी पुस्तकांनी भरलेली पुस्तकपेटी वस्तीतून फिरविण्यात येणार आहे. महिलांनी या पेटीतून आवडीची पुस्तके घेऊन वाचावी, हा यामागील उद्‌देश आहे. महिलांनी कोणत्या पुस्तकाचे वाचन केले, त्यातून त्यांना काय जाणवले, याची नोंद देखील ठेवली जाणार आहे, असे सेवेकरी यांनी सांगितले.

डोनाल्ड ट्रम्प ज्या पक्षाचे त्या पक्षाचा 'हा' मराठी माणूस आहे अध्यक्ष

न. म. जोशी यांच्यासह अनेक साहित्यिक व नामवंत व्यक्ती पुस्तके देवून या उपक्रमात सहभागी होणार आहे. सामान्य पुणेकरांनी , साहित्यिकांनी, प्रकाशकांनी देखील पुस्तके देऊन या उपक्रमात सहभागी व्हावे. त्याकरिता बुधवार पेठेतील श्रीनाथ टॉकीजसमोर असलेल्या सहेलीच्या कार्यालयात पुस्तके आणून द्यावी, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

दिल्लीतील शाळांना मेलेनिया ट्रम्प यांनी दिली भेट; म्हणाल्या...

कर्तृत्ववान महिलांची माहिती देणारी पुस्तके
झाशीची राणी लक्ष्मीबाई, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, डॉ.आनंदीबाई जोशी यांसह विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांच्या कार्याची माहिती देणारी पुस्तके पेटीमध्ये असणार आहेत. पुस्तकांचे वाचून महिलांनी स्वतःसाठी व आपल्या मुलांचा चांगला मार्ग आखावा, हा आमचा प्रयत्न आहे, असे देशपांडे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Special activities for Prostitution women in Pune