...आणि दररोजच्या ताणतणावातही पोलिसांतील कलाकारांचा लागला सूर!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 November 2020

पोलिस कर्मचारी संतोष भोईटे यांनी 'ओंकार स्वरुपा' हे भक्तिगीत सादर केले. तर किरण देशमुख यांनी 'मनाच्या धुंदीत लहरीत येना' हे मराठी गीत गायले.

पुणे : ऐरवी कामाचा ताण...बंदोबस्ताची तयारी..अतिरिक्त कामाचा भार अशा एक ना अनेक कामांच्या दबावात दमणारे पोलिस कर्मचारी आणि अधिकारी. अशा ताणतणावापासून काही क्षण दूर जात याच पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी सोमवारी (ता.९) स्वतःमधील कलाकाराला व्यासपीठावर उतरविले, बघता-बघता त्यांच्यातील कलाकारांनी मराठी, हिंदी गीते मनसोक्तपणे गात उपस्थितांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले. दस्तुरखुद्द पोलिस आयुक्तांनीही त्यास दिलखुलासपणे दाद दिली. निमित्त होते, 'दीपमेळा 2020' या कार्यक्रमाचे! 

'रवींद्र बऱ्हाटे हाजीर हो!' कोर्टात हजर होण्यासाठी शहरात लागले फ्लेक्स

पुणे पोलिसांतर्फे सोमवारी छोटेखानी दीपमेळा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर पोलिस आयुक्त (प्रशासन) डॉ.जालिंदर सुपेकर, पोलिस उपायुक्त (गुन्हे) बच्चन सिंह, विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त मितेश घट्टे, पोलिस उपायुक्त स्वप्ता गोरे, आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके उपस्थित होत्या. 

मेहबूबांनी पुन्हा सूर बदलला; तिरंग्याबद्दलच्या वक्तव्याबाबत केला खुुलासा​

पोलिस कर्मचारी संतोष भोईटे यांनी 'ओंकार स्वरुपा' हे भक्तिगीत सादर केले. तर किरण देशमुख यांनी 'मनाच्या धुंदीत लहरीत येना' हे मराठी गीत गायले. त्यापाठोपाठ संदिप केंगार यांनी 'ये वतन वतन मेरे आबाद रहे तू' आणि संदीप सूर्यवंशी यांनी 'संदेसे आते है' हे गीत गायले. यावेळी डॉ. सुपेकर यांनीही 'जिंदगी का सफर' हे गीत सादर केले. पोलिस आयुक्तांसह उपस्थितांनी त्यांना दाद दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांनी केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A special program called Deepmela was organized by Pune Police