अकरावीला ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांनो, विशेष फेरीच्या निवड यादीला दिली स्थगिती!

Admission
Admission

पुणे : राज्य सरकारने सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील (एसईबीसी) विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून (ईडब्ल्यूएस) लाभ देण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार मराठा आरक्षण लागू असणाऱ्या विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस प्रवर्ग किंवा खुला प्रवर्ग निवडण्यासाठी इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशाच्या पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून दिली असून त्याचे सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर केले आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेतील विशेष फेरीअंतर्गत गुरुवारी जाहीर होणाऱ्या निवड यादीला (कॉलेज ऍलॉटमेंट) स्थगिती देण्यात आली असल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातर्फे दिली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार आता विशेष फेरीची निवड यादी (कॉलेज ऍलॉटमेंट) येत्या सोमवारी (ता.28) जाहीर केली जाणार आहे.

प्रवेशातंर्गत विशेष फेरीची निवड यादी गुरुवारी सकाळी अकरा वाजता जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र नियोजित वेळेत ही यादी जाहीर न झाल्याने प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रवेश प्रक्रिया राबविणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने विशेष फेरीतील निवड यादीला स्थगिती दिल्याची माहिती दुपारी संकेतस्थळावर अपडेट केली. 

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतंर्गत एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस वर्ग किंवा खुला प्रवर्ग निवडण्याची सुविधा प्रवेशाच्या पोर्टलवर उपलब्ध करून दिली असून त्याचे सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर केले आहे. अकरावीच्या प्रवेशाची पुढील कार्यवाही सुधारित वेळापत्रकानुसार करावी आणि या वाढीव वेळेत बाकी असलेल्या विद्यार्थ्यांनाही अर्ज भरता येतील, असेही शिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे. 

इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक : 
- कालावधी : कार्यवाहीचा तपशील 
- 24 ते 26 डिसेंबर :- ईएसबीसी विद्यार्थ्यांनी ईडब्ल्यूएस किंवा खुला प्रवर्ग निवडणे.
- अंडरटेकिंग अपलोड करणे अर्जाचा भाग एक भरून लॉक करणे व व्हेरीफाय करून घेणे. (बदल करावयाचा नसल्यास अर्ज भाग एक अनलॉक करू नये.)
- या कालावधीत इतर विद्यार्थ्यांनाही आपला अर्ज भाग-एक भरता येईल, त्यामध्ये बदल करता येईल.
- यापूर्वी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश रद्द करता येईल व विशेष फेरीसाठी लगेच अर्ज सादर करता येईल. 
27 डिसेंबर :- प्रवेशासाठी पसंतीक्रम नोंदविणे (भाग-दोन भरणे) व लॉक करणे.
- यापूर्वी ऑप्शन फॉर्म भरला असल्यास त्यामध्ये बदल करता येतील. 
28 डिसेंबर (सायंकाळी पाच वाजता) :- प्रवेश फेरी अंतर्गत प्रवेशासाठी निवड/गुणवत्ता यादी प्रदर्शित करणे.
- प्रवेश फेरीचे कट-ऑफ संकेतस्थळावर दर्शविणे. 

29 ते 31 डिसेंबर (सायंकाळी सहा वाजेपर्यंत) :- विद्यार्थ्यांनी मिळालेल्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असल्यास प्रोसिड फॉर ऍडमिशन करणे.
- विद्यार्थ्यांने मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश निश्‍चित करणे.
- महाविद्यालयाने विद्यार्थ्यांचे प्रवेश ऑनलाइन निश्‍चित करणे, घेतलेला प्रवेश रद्द करणे तसेच प्रवेश नाकारता येणे.
- सर्व तीनही कोटांतर्गत प्रवेश सुरू राहतील. व्यवस्थापन कोट्यासह इनहाऊस आणि अल्पसंख्याक कोट्यांतर्गत जागा येथून पुढे भरता येतील, तसेच त्यांचे प्रत्यार्पण करता येईल. 

31 डिसेंबर (सायंकाळी आठ वाजेपर्यंत) :- झालेले प्रवेश संकेतस्थळावर नोंदविण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयांसाठी अतिरिक्त वेळ. 
01 जानेवारी 2021 :- प्रवेशाची विशेष फेरी पूर्ण झाल्यानंतर रिक्त राहणाऱ्या जागांचा तपशील जाहीर करणे. यामध्ये राखीव कोट्यांतून प्रत्यार्पित केलेल्या सर्व रिक्त जागांचाही समावेश असेल. 

विद्यार्थी आणि पालकांसाठी सूचना : 
- विद्यार्थ्यांस घेतलेला प्रवेश रद्द करायचा असल्यास तशी विनंती संबंधित कनिष्ठ महाविद्यालयास करावी आणि आपला प्रवेश रद्द करून घ्यावा. 
- प्रवेश रद्द करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी शांतपणे विचार करावा, कारण प्रवेश प्रक्रियेच्या नियोजित फेऱ्यांपैकी ही अखेरची प्रवेश फेरी आहे.
- या विशेष फेरीमध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांने ऑनलाइन संमती देणे बंधनकारक आहे. तरी आपला पसंतीक्रम ऑप्शन फॉर्म भाग दोन वेळेत लॉक केला असल्याची खात्री करावी. 
- यापूर्वी अर्ज भरणे राहून गेलेल्या विद्यार्थ्यांनाही या वाढीव वेळेत आपला अर्ज सादर करता येईल. 
- द्विलक्षी विषयांच्या प्रवेशाची कार्यपद्धती लवकरच जाहीर करण्यात येईल. 
- प्रवेशाचे अधिकृत संकेतस्थळ : https://11thadmission.org

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com