
श्रीनगर ते लेह! प्रीती मस्के यांचा सायकलप्रवास तीन दिवसांतच पूर्ण
पुणे - महिला सशक्तिकरणाचा संदेश देत श्रीनगर ते लेह- खार्दुंगला पास हे ४८० किलोमीटरचे अंतर तीन दिवस सात तास व चार मिनिटांत पूर्ण करून पुण्यातील ४५ वर्षीय प्रीती मस्के यांनी अनोखा विक्रम प्रस्थापित केला आहे. जगातील सर्वात उंच रस्ता म्हणून खार्दुंगला टॉप (१८,४७९) ची ओळख आहे. मस्के यांनी या टॉपपर्यंत सायकलवर प्रवास केला आहे.
ही मोहीम एकट्याने पूर्ण करणाऱ्या त्या पहिली भारतीय महिला ठरल्या आहेत. १३ सप्टेंबर २०२१ रोजी पीआरसी ऑफिस श्रीनगर येथून जम्मू-काश्मीर टुरिझमचे संचालक जी. एन. इटू, आयुक्त समरद हाफिझ आणि नॅशनल एमटीबी असोसिएशनचे रियाझ यांनी हिरवा झेंडा दाखवून मस्के यांच्या सायकल मोहिमेला शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा: जितेंद्र गवारेंची माउंट मनास्लू शिखरावर यशस्वी चढाई
या प्रवासाबाबत मस्के यांनी सांगितले की, ‘प्रवासात नागरिकांचा तसेच भारतीय सैनिकांचा भरपूर पाठिंबा मिळाला. हा भाग महिलांसाठी अतिशय सुरक्षित आहे. येथील नागरिक अतिशय प्रेमळ व सहकार्य करणारे आहेत. जागोजागी आर्मी कॅम्प हॉटेल्स व होमस्टे राहण्यासाठी उपलब्ध आहेत. हा भाग सायकलिंगसाठी फिरण्यासाठी जून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत चालू असतो. ऑक्टोबरपासून बर्फवृष्टी चालू झाल्यानंतर पर्यटकांसाठी बंद होतो.’
मस्के यांनी एकट्यानेच स्वतःचे सामान स्वतःबरोबर घेऊन ही मोहीम पूर्ण केली आहे. या मोहिमेदरम्यान दिवसाचे अतिशय तप्त ऊन व रात्रीची हाडे गोठवणारी थंडी अशा आव्हानांना त्यांना सामोरे जावे लागले. कधी अतिशय उंच घाटवाटा तर कधी उतार असे अंतर पार करत सोनमर्ग, जोझिला पास, कारगिल, नमिकला पास, फोतुला टॉप अशी ठिकाणे पार करत त्या लेह येथे १६ सप्टेंबरला पोहोचल्या.
हेही वाचा: पुण्यात ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन
प्रीती मस्के यांनी विविध सायक मोहिमा यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. तर ‘गोल्डन क्वॉड्रिलॅट्रल’ म्हणजेच मुंबई, दिल्ली, कोलकत्ता, चेन्नई आणि मुंबई असा पाच हजार ९०० किलोमीटर पर्यंतचा प्रवास पूर्ण केला असून त्यांच्या नावाची नोंद गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड मध्ये झाली आहे. तसेच त्यांनी काश्मीर ते कन्याकुमारी हे तीन हजार ७५० किलोमीटरची सायकल मोहिम देखील यशस्वीपणे पूर्ण केली आहे.
‘या भागांमध्ये अतिशय थंड हवामान उंच डोंगर अतिशय उंच डोंगराळ भाग ऑक्सिजनची कमतरता अशी आव्हाने पार करावी लागतात. येथील कमी ऑक्सिजन असलेल्या हवामानाला जुळवून घेता यावे यासाठी हळूहळू प्रवास करत उंची गाठावी लागते तेव्हाच असा प्रवास सुखकर होतो.’
- प्रीती मस्के, सायकलिस्ट
Web Title: Srinagar To Leh Preeti Maske Cycling Journey Completed In Just Three Days
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..