स्टार किड्‌सलाही सिद्ध करावी लागेल अभिनय क्षमता - अभिनेता द्विब्येंदू भट्टाचार्य

dibyendu bhattacharya
dibyendu bhattacharya

पुणे - हिंदी चित्रपटसृष्टीत ‘ओव्हर द टॉप’ (ओटीटी) प्लॅटफॉर्ममुळे कसदार अभिनेत्यांसाठी एक नवे माध्यम खुले झाले आहे. यात केवळ दर्जाला स्थान आहे. त्यामुळे इथे ‘स्टार किड्‌स’लाही अभिनय क्षमता सिद्ध करावी लागेल, त्याला पर्याय नाही, असे मत अभिनेता दिब्येंदू भट्टाचार्य यांनी व्यक्त केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

भट्टाचार्य यांनी बुधवारी ‘सकाळ’ कार्यालयाला भेट दिली आणि संपादकीय सहकाऱ्यांशी संवाद साधला. अभिनयातील प्रवासाबद्दल ते म्हणाले, ‘‘बंगाली घरांमध्ये सांस्कृतिक वातावरण असतेच व त्याचा मला फायदा झाला. दहावी उत्तीर्ण झाल्यावर मी प्रायोगिक नाटकांमध्ये अभिनयाला सुरुवात केली व नंतर राष्ट्रीय नाट्य विद्यालयात (एनएसडी) प्रवेश घेतला. मीरा नायर यांच्या ‘मॉन्सून वेडिंग’मध्ये मला ‘ब्रेक’ मिळाला व त्यातूनच खूप मोठी ओळख मिळाली.’

ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे ताज्या दमाचे व प्रयोगशील दिग्दर्शक नवनवीन, वास्तवदर्शी विषय घेऊन येत आहेत. कलाकारांच्या दर्जेदार अभिनयामुळे त्याकडे प्रेक्षकही आकर्षित होत आहेत. सेन्सॉर नसल्यामुळे ‘ओटीटी’वर वास्तववादी कथानक अधिक जोरकसपणे मांडता येते. जगभरातील प्रेक्षक केव्हाही आणि कोठेही चित्रपटाचा आनंद घेऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.

हिंदी चित्रपटांतील नेपोटिझमबद्दल आपण त्याचे विरोधक किंवा समर्थक नसल्याचे भट्टाचार्य यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘‘अभिनेत्याच्या मुलाला अभिनेता बनण्याचा पूर्ण हक्क आहे, परंतु त्याने कसदार अभिनयाने स्वतःचे स्थान निर्माण करावे. त्याला पालकांच्या ओळखीचा नक्कीच फायदा होतो. पण ओटीटीमुळे या सिताऱ्यांच्या मुला-मुलींनाही अभिनय क्षमता सिद्ध करावी लागेल. ज्याच्याकडे गुणवत्ता आणि दर्जा आहे, त्यालाच लोक आता स्वीकारतील.’’

एनएसडी लॉजिकल अंडरस्टॅंडिंग 
दिल्लीतील ‘एनएसडी’मध्ये केवळ अभिनय शिकवला जात नाही, तर त्यामागची सैद्धांतिक आणि वैज्ञानिक पार्श्‍वभूमी समजावून सांगितली जाते. तेथून बाहेर पडलेले अनेक कलाकार हिंदी चित्रपटसृष्टीत दमदार अभिनयाच्या जोरावर आपला ठसा उमटवत आहेत.

पुरस्कारात ओटीटीलाही स्थान हवे
चित्रपटगृहातील सिनेमा आणि इंटरनेटवरील सिनेमा हे दोन प्रवाह आहेत. त्यामुळे कोणतीही स्पर्धा असली, तरी तिथे आता ओटीटीचा विचार व्हावा. सरकारकडून दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांसाठी ओटीटीवर काम करणाऱ्या कलाकारांना स्थान मिळावे, अशी मागणी भट्टाचार्य यांनी केली.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com