स्टार्टअप्स देशाला बदलू शकतो - हर्ष मारिवाला

Pune-Startup-Fest
Pune-Startup-Fest

पुणे - ‘स्टार्टअप सुरू करताना आपण काय वेगळे देत आहोत, हे फार महत्त्वाचे असते. उत्पादनात नावीन्य असेल व त्यातून ग्राहकांच्या गरजा पूर्ण होत असतील तर स्टार्टअप नक्कीच यशस्वी होईल. स्टार्टअप्स देशाला बदलू शकतो. त्यांनी देशाला बदलायलाच हवे. त्यासाठी केवळ सरकारवरच अवलंबून राहू नये,’’ असे मत ‘मारिको लिमिटेड’चे संस्थापक-अध्यक्ष हर्ष मारिवाला यांनी आज व्यक्त केले. ‘स्टार्टअप इंडिया’, ‘स्किल इंडिया’, ‘अग्नी’, ‘शिक्षण मंत्रालयाचे- इनोव्हेशन सेल’ यांच्या अंतर्गत आणि ‘फिकॉमर्स’ आणि ‘सकाळ’च्या सहकार्याने ‘पुणे स्टार्टअप फेस्ट’चे (पीएसएफ) आयोजन करण्यात आले आहे. या आॅनलार्इन फेस्टचे उद्‍ घाटन मारिवाला यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ‘सकाळ’च्या संचालिका मृणाल पवार, सीओइपीचे संचालक डॉ. प्रा. बी. बी. आहुजा, उपसंचालक प्रा. मुकुल सुतावणे, प्रा. पी. आर. धामणगावकर, डॉ. प्रा. माधुरी कर्णिक आणि प्रा. राहुल आढाव उपस्थित होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे’ (सीओईपी) च्या ‘भाऊज आंत्रपिनर्सशीप’ सेलने या फेस्टसाठी पुढाकार घेतला आहे. मृणाल पवार यांनी यावेळी मारिवाला यांची मुलाखत घेतली. मारिवाला यांनी यावेळी त्यांच्या उद्योगजगतेचा प्रवास उलगडला. मारिवाला म्हणाले, ‘‘अस्तित्वास असलेल्या स्टार्टअपमध्ये काहीतरी बदल करून, त्याच पद्धतीचा व्यवसाय सुरू केला तर तो यशस्वी होण्याच्या शक्यता कमी असतात. अपयश आले तर खचून जाऊ नका. त्यातून आलेला अनुभवदेखील महत्त्वाचा असतो.’’ डॉ. आहुजा म्हणाले, ‘‘फेस्टचा स्टार्टअपला मोठा फायदा होणार आहे. तसेच त्यांची इको-सिस्टिम विकसित होण्यास मदत होर्इल.’’ डॉ. प्रा. माधुरी कर्णिक यांनी प्रास्ताविक केले. अंजली नायर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. अभिषेक मोरे यांनी आभार मानले.

मारिवाला यांचा यशाचा मंत्र 

  • ज्या क्षेत्राचे स्टार्टअप सुरू करायचे, त्याचा आधी चांगला अभ्यास करा
  • यशस्वी होण्यासाठी कोणतेही शॉर्टकट मारू नका
  • कोणताही निर्णय घेताना संस्थेचे हित लक्षात ठेवा 
  • आपल्यातील क्षमता ओळखून, त्यानुसार काम करावे 
  • नियमित वाचन करा, नवीन लोकांना भेटा व संशोधन सुरू ठेवा 
  • बदलत्या परिस्थितीनुसार तंत्रज्ञान आत्मसात करा 
  • चांगले कर्मचारी निवडा 
  • व्यवसाय करताना दूरदृष्टी ठेवा 

स्टार्टअपनुसार सात झोन 
पीएसएफने यावर्षी १०० पेक्षा जास्त स्टार्टअप्स, ५५ हून गुंतवणूकदार आणि मार्गदर्शक, अनेक विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिपचे आयोजन केले आहे. व्हर्च्युअल स्टार्टअप एक्स्पोमध्ये तांत्रिक, सामाजिक, आरोग्य आणि जीवनशैली, विद्यार्थी, शेती, नावीन्य आणि ब्रेकिंग द पॅनडामिक असे सात झोन आहेत. 

समाजाच्या उन्नतीसाठी स्टार्टअप अत्यंत गरजेचे आहेत. त्यातून ज्ञान, देशाची संपत्ती आणि रोजगार वाढेल. आपण समाज, सरकार आणि लोकशाही म्हणून एकत्र येत स्टार्टअपला मदत करायला हवी. चीनने हे साध्य केले आहे. त्यामुळे तेथील गरीबी कमी झाली आहे. त्यांच्या तुलनेत आपल्याला अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. या फेस्टसारखे उपक्रम समाजाच्या उपयोगाचे आहेत.
- प्रतापराव पवार, अध्यक्ष, ‘सकाळ’ आणि अध्यक्ष, नियामक मंडळ, सीओईपी 

फेस्टमध्ये सहभागी होण्यासाठी व इंटर्नशिपसाठी संकेतस्थळ - www.punestartupfest.in

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com