सहकारी संस्थांच्या निवडणुकांना पुन्हा स्थगिती; राज्य सरकारने दिले आदेश

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 17 January 2021

राज्यात शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका पार पडल्या. तसेच, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे.

पुणे : सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने नुकताच जाहीर केला. परंतु राज्य सरकारच्या पातळीवर हालचाली झाल्यानंतर निवडणूक प्राधिकरणाने पुन्हा निवडणुकांना 31 मार्चपर्यंत स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. 

राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 डिसेंबरपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. ही मुदत संपल्यानंतर निवडणुकांबाबत निर्णय घेणे अपेक्षित होते. परंतु 11 जानेवारीपर्यंत सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे राज्य निवडणूक प्राधिकरणाने 12 जानेवारीला सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रियाही सुरू केली.

पुण्यात दुसऱ्या टप्प्यातील शाळांची घंटा कधी वाजणार? अनिश्‍चितता कायम​

मात्र, राज्य सरकारने या निवडणुकांना पुन्हा स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. 
त्यानुसार राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 मार्चपर्यंत पुढे ढकलण्याचे आदेश जारी केले आहेत. स्थगितीचा कालावधी संपल्यानंतर सहकारी संस्थांच्या निवडणुका टप्प्यानुसार घेण्यात येतील, असे निवडणूक प्राधिकरणाने आदेशात नमूद केले आहे. 

अकरावीला ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांनो, दुसऱ्या संवर्गातील ऍडमिशनसाठी उद्यापर्यंत मुदत​

सहकारी संस्थांच्या निवडणुकांनाच स्थगिती कशासाठी?
राज्यात शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका पार पडल्या. तसेच, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. मग सहकारी संस्थांच्या निवडणुकांनाच स्थगिती कशासाठी, असा प्रश्‍न सहकार क्षेत्रातून विचारण्यात येत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State Election Authority decided to postpone elections of cooperative societies till March 31