पुण्यात दुसऱ्या टप्प्यातील शाळांची घंटा कधी वाजणार? अनिश्‍चितता कायम

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 17 January 2021

- आठवडाभरात निर्णय अपेक्षित
- विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याबाबत पालक चिंतेत

पुणे : राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग येत्या 27 जानेवारीपासून सुरू करण्याला मान्यता दिली असली, तरी शाळा सुरू करण्याबाबत स्थानिक यंत्रणांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे पुण्यात दुसऱ्या टप्प्यातील शाळांची घंटा कधी वाजणार?, याबाबत अद्याप अनिश्‍चितता आहे.

अति झालं! पुण्यात पोलिसालाच दिली नोकरी घालविण्याची धमकी​

राज्यात पहिल्या टप्प्यात इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग 23 नोव्हेंबरपासून सुरू करण्याला राज्य सरकारने मान्यता दिली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुसऱ्या टप्प्यातील शाळा (5वी ते 8वीचे वर्ग) सुरू करण्याला मंजुरी दिली. त्यानुसार शालेय शिक्षण विभागाने पाचवी ते आठवीचे वर्ग येत्या 27 जानेवारीपासून सुरू करण्यात येतील, असे शुक्रवारी स्पष्ट केले. शाळा सुरू करण्याच्या पूर्व तयारीची जबाबदारी शिक्षण विभागाने स्थानिक प्रशासनावर सोपविली आहे. मात्र, पुणे जिल्हा आणि शहरातील शाळा सुरू करण्याबाबत स्थानिक प्रशासनाने अजून कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे पुण्यातील शाळा 27 जानेवारीपासून सुरू होणार की नाहीत, याबाबत अद्याप प्रश्‍नचिन्ह आहे.

‘पीएम केअर फंडा’चा हवाय हिशोब; माजी अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना विचारले प्रश्न​

पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुनंदा वाखारे म्हणाल्या, "पहिल्या टप्प्यात राज्य सरकारच्या दिलेल्या सूचनांप्रमाणे इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले. त्याचवेळी शिक्षकांची कोरोना तपासणी आणि शाळांचे निर्जंतुकीकरण केले आहे. तसेच शाळांची नियमित स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. आता इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यापुर्वी देखील शाळांचे निर्जंतुकीकरण आणि उर्वरित शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी केली जाईल. राज्य सरकारने दुसऱ्या टप्प्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला असला, तरी अद्याप शाळा सुरू करण्याबाबतचा आदेश आणि सूचना शिक्षण विभागाकडून आलेल्या नाहीत. या सूचना आल्यानंतर शाळा सुरू करण्याची तयारी केली जाईल आणि त्यानुसार पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होतील.''

EDने रॉबर्ट वड्रांकडे वळवला मोर्चा; ताब्यात घेण्यासाठी हायकोर्टात केला अर्ज

येत्या काही दिवसात होणार निर्णय
राज्य सरकारने दुसऱ्या टप्प्यातील शाळा म्हणजेच पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याला मान्यता दिली आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर स्थानिक परिस्थितीचा अंदाज घेतला जाईल. तसेच महापौर, पदाधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात येईल. ही चर्चा झाल्यानंतर येत्या काही दिवसांत शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय जाहीर केला जाईल.''
- विक्रम कुमार, आयुक्त, पुणे महानगरपालिका

अकरावीला ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांनो, दुसऱ्या संवर्गातील ऍडमिशनसाठी उद्यापर्यंत मुदत​

"इयत्ता पाचवी ते आठवीचे म्हणजे साधारणत: 10 ते 13 वर्षे वयोगटातील विद्यार्थी. कोरोनाचा संसर्ग कमी होत असला, तरी या वयोगटातील विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणे पुरेसे सुरक्षित वाटत नाही. शाळेतही पुरेशी काळजी घेतली गेली, तरी हे विद्यार्थी एकमेकांमध्ये मिसळणार, त्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे किमान आणखी एक-दोन महिने शाळा सुरू करू नये.''
- सपना शिंदे, पालक

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Still uncertainty about starting second phase school in Pune