विद्यापीठ-कॉलेजसाठी पाच दिवसांचा आठवडा होणार? राज्य शासनाच्या हालचाली सुरू

ब्रिजमोहन पाटील
Monday, 12 October 2020

सप्टेंबर महिन्यात विद्यापीठ व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन करताना त्यामध्ये पाच दिवसांचा आठवडा जाहीर करा, अशी प्रमुख मागणी केली होती.

पुणे : शासकीय कार्यालयाप्रमाणे विद्यापीठ आणि महाविद्यालयांना पाच दिवसांचा आठवडा करण्यासाठी राज्य शासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. शनिवारी सुट्टी दिली तर शैक्षणिक आणि कार्यालयीन कामकाजावर काय परिणाम होईल, याचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना विद्यापीठांना दिल्या आहेत.

राज्य सरकारने शैक्षणिक विभाग वगळता इतर विभागांना पाच दिवसांचा आठवडा जाहीर केला आहे. त्यामुळे या विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे दैनंदिन कामाचे तास वाढले असले तरी लागून दोन दिवसांची हक्काची सुट्टी मिळत आहे. हाच नियम शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ यांना लागू करावा, अशी मागणी केली जात होती, परंतु अद्याप याबाबत सरकारने विचार केला नाही. सध्या नागरिकांच्या सोईसाठी महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी विद्यापीठातील कामकाज सुरू असते. पण प्रत्येक शनिवारी सुट्टी दिली तर बाहेर गावच्या विद्यार्थी, प्राध्यापकांची काही प्रमाणात अडचण येऊ शकते. यावर तोडगा काढणे गरजेचे आहे.

NEET 2020 Result : पुन्हा होणार परीक्षा; निकाल पुढे ढकलला!​

पाच दिवसांचा आठवडा केल्यास विद्यार्थी, प्राध्यापक यांचा प्रवास कमी होऊन रस्त्यावरील वर्दळ कमी होईल. शनिवारी तासांची संख्या कमी असल्याने शहरी व ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असते. या कारणांमुळे पाच दिवसांचा आठवडा करणे फायदेशीर ठरेल, असे मत शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

सप्टेंबर महिन्यात विद्यापीठ व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन करताना त्यामध्ये पाच दिवसांचा आठवडा जाहीर करा, अशी प्रमुख मागणी केली होती. त्यामध्ये आंदोलनावर तोडगा काढताना याबाबत सकारात्मक विचार करू असा निर्णय घेऊ, असे आश्‍वासन सरकारतर्फे देण्यात आले होते. त्यानंतर उच्च शिक्षण विभागाने सर्व विद्यापीठांच्या कुलसचिवांना पत्र पाठवून पाच दिवसांचा आठवडा करण्यासाठी अभिप्राय कळविण्यास सांगितला आहे. तर पुणे विद्यापीठाने सर्व महाविद्यालयांनी त्यांचा अभिप्राय 14 ऑक्‍टोबर पर्यंत सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

'पार्ले जी' कंपनीचा जाहिरातींबाबत मोठा निर्णय; सोशल मीडियावर प्रचंड कौतुक

''पाच दिवसांचा आठवडा केल्यास रोजच्या कामाचा एक तास वाढणार आहे, पण त्याचा फायदा विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह सर्वांना होईल. कुटूंबासोबत वेळ देता येईलच, विद्यार्थ्यांना अभ्यासासह त्यांचे छंद जोपासण्यास व नव्या गोष्टी शिकण्यासाठी वेळ मिळेल. त्यामुळे सरकारने याबाबत निर्णय घेतला पाहिजे.''
- प्रकाश पवार, अध्यक्ष, शिक्षक हितकारीणी समिती

''विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयांमध्ये पाच दिवसांचा आठवडा लागू व्हावा यासाठी विद्यापीठ सकारात्मक आहे. या निर्णयामुळे विद्यापीठाच्या कामावर, शैक्षणिक वेळापत्रकावर काय परिणाम होईल याचा सविस्तर अभिप्राय शासनाला सादर केला जाईल.''
- डॉ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 'या' किल्ल्यावर अचानक वाढली गर्दी​

''कनिष्ठ महाविद्यालयापासून ते वरिष्ठ महाविद्यालयाचे सर्व विद्याशाखांचे (मल्टिफॅकल्टी कॉलेज) अभ्यासक्रम चालविणाऱ्या मोठ्या महाविद्यालयांना पाच दिवसांचे काम सहा दिवसात बसविणे अडचणी येतील. हा निर्णय लागू केल्यास महाविद्यालयांचे रोजचे काम दोन तासांनी वाढू शकले. त्यामुळे सकाळी साडे सात ते सायंकाळी साडे सात असे महाविद्यालय सुरू राहील, दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना याची अडचण येऊ शकेल, याचा विचार झाला पाहिजे.
- डॉ. राजेंद्र झुंजारराव, प्राचार्य, मॉडर्न महाविद्यालय, पुणे

फायदे :-
- विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कुटुंबासोबत वेळ देता येईल.
- दोन दिवसांच्या सुट्टीमुळे छंद जोपासणे, नवे काही तरी शिकणे शक्‍य होईल.
- मानसिक समाधान असल्याने काम करण्याची क्षमता वाढेल.

आव्हाने :-
- महाविद्यालयांना एका सत्रात 90 तास घेणे अनिर्वाय आहे
- वेळापत्रक बदलल्यास अभ्यासक्रम पूर्ण कसा होणार
- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आठवडा लागू केल्यास शैक्षणिक कामात अडथळे

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State govt has taken steps about five day week like government offices for universities and colleges