esakal | 'जिल्हा स्वच्छता मिशन'चा एका रात्रीत खेळ खल्लास; राज्यातील स्वच्छता कक्ष इतिहासजमा होणार!
sakal

बोलून बातमी शोधा

Swachha_Bharat_Mission

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे येत्या १ ऑगष्टपासून जिल्हा परिषदांमधील जिल्हा व तालुकास्तरावरील सर्व कक्षांना टाळे लागणार आहेत.

'जिल्हा स्वच्छता मिशन'चा एका रात्रीत खेळ खल्लास; राज्यातील स्वच्छता कक्ष इतिहासजमा होणार!

sakal_logo
By
गजेंद्र बडे

पुणे : केंद्र पुरस्कृत पाणी व स्वच्छता मिशनचे राज्यातील सर्व जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष आणि तालुका पातळीवरील गट संशोधन केंद्र बंद करण्याचा तडकाफडकी निर्णय राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रालयाने घेतला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

याबाबतचे पत्र दोन दिवसांपूर्वीच सर्व जिल्हा परिषदांना पाठविण्यात आले असून या विभागातील सर्व कर्मचाऱ्यांच्या सेवा ३१ जुलैला समाप्त करण्यात येत असल्याचे कळविण्यात आले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे येत्या १ ऑगष्टपासून जिल्हा परिषदांमधील जिल्हा व तालुकास्तरावरील सर्व कक्षांना टाळे लागणार आहे. 

या निर्णयामुळे जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील या कक्षांमध्ये गेल्या दीड दशकापासून कार्यरत असलेल्या राज्यातील सुमारे २ हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा आली आहे. या कर्मचाऱ्यांना केवळ दोनच दिवस आधी म्हणजे बुधवारी (ता.२९) याबाबत कळविण्यात आले आहे. यामुळे या कर्मचाऱ्यांवर 'उद्धवा, अजब तुमचे सरकार'  असे म्हणण्याची वेळ आली आहे.

हम भी किसीसे कम नहीं; बोर्डाच्या परीक्षेत चमकली कष्टकऱ्यांची पोरं!​

तसं पाहिलं तर, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा, शौचालये उभारणी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आवडता विषय आहे. या अभियानासाठी निधीही केंद्र सरकारचाच आहे. यानुसार पंतप्रधान मोदी यांचे या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीवर प्रथमापासून विशेष लक्ष आहे. त्यातूनच पंधराव्या वित्त आयोगाचा निम्मा निधी स्वच्छता, पाणीपुरवठा, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन या बाबींवर खर्च करण्याचे बंधन केंद्र सरकारने सर्व ग्रामपंचायतींवर घातले आहे. या बंधनामुळे एकीकडे या विभागाचे काम आणि जबाबदारी वाढलेली आहे, पण दुसरीकडे हा विभागच कायमस्वरूपी बंद करण्याचा घाट राज्य सरकारने घातला आहे. यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

पुण्यात फ्लॅट, रुम्स शोधताय? फेसबुकवरील 'या' ग्रुपची तुम्हाला होईल मदत

राज्यातील गावे कायमस्वरूपी हागणदारी मुक्त व्हावीत, या उद्देशाने राज्याचे तत्कालीन ग्रामविकास मंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी 'संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान' सुरू केले होते. याच अभियानाच्या आधारे तत्कालीन केंद्र सरकारने २००३ पासून देशभर संपूर्ण स्वच्छता अभियान सुरू केले होते.

हे अभियान २०१४ पर्यंत चालू होते. २०१४ मध्ये या अभियानाचे नाव बदलून 'स्वच्छ भारत मिशन' असे करण्यात आले. हे अभियान अद्याप चालू असून, याचा आता दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, हा स्वच्छता कक्ष २००३ पासून आजतागायत चालू आहे, पण १ ऑगष्टपासून हा कक्ष इतिहास जमा होणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image
go to top