महापालिकेच्या पैशांची जबाबदारी कारभाऱ्यांची - अजित पवार

Ajit-Pawar
Ajit-Pawar

वडगाव मावळ - ‘पिंपरी-चिंचवड महापालिकेने जनतेचा असलेला पैसा राष्ट्रीयीकृत बॅंकेतून काढून येससारख्या खासगी बॅंकेत ठेवण्याचे काहीच कारण नव्हते. आता या पैशांची जबाबदारी जे महापालिका चालवतात त्यांचीच आहे,’’ अशी टिप्पणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. महाविकास आघाडीचे सरकार व्यवस्थित काम करीत असून, त्याला कोणताही धोका नाही, असा निर्वाळाही त्यांनी दिला. 

एका खासगी कार्यक्रमासाठी पवार शुक्रवारी (ता. ६) येथे आले होते. त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सुमारे ९८४ कोटी रुपये येस बॅंकेत अडकले आहेत. त्याबाबत बोलताना पवार म्हणाले, ‘‘महानगर पालिकेतील पैसा हा जनतेचा पैसा आहे. तो राष्ट्रीयीकृत बॅंकेतून काढून खासगी बॅंकेत ठेवण्याचे काहीच कारण नव्हते. बॅंक अडचणीत आल्यास आता महापालिका चालविणारेच त्याला जबाबदार आहेत. तरीही पालकमंत्री या नात्याने नगरविकास खात्याकडून व आयुक्तांकडून याबाबत अधिक माहिती घेईन.’’

महापालिकेच्या कारभारावर टीका करताना पवार म्हणाले, ‘‘आमच्या काळात सहकाऱ्यांना बरोबर घेऊन परिसराचा चांगल्या प्रकारे विकास केला होता. परंतु गेल्या अडीच-तीन वर्षात काय अवस्था झाली आहे. मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार वाढला आहे. अनधिकृत बांधकामे, शास्तीकर व रेडझोनचा प्रश्‍न ‘जैसे थे’ आहे. केंद्रात दोनदा सरकार येऊनही ते सोडविण्यात भाजपला पूर्णपणे अपयश आले आहे. 

महाविकास आघाडीचे सरकार व्यवस्थित काम करीत असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जोपर्यंत पाठबळ आहे, तोपर्यंत सरकारला कोणताही धोका नाही.’’

‘ऑनलाइन’साठी पालिकेने बॅंक बदलली
पिंपरी - रिझर्व्ह बॅंकेच्या निर्बंधांमुळे येस बॅंकेची ऑनलाइन यंत्रणा बंद झाल्यामुळे महापालिकेने करदात्यांच्या सुविधेसाठी बॅंक बदलली. आता कर, पाणीपट्टी आदी भरण्याची सुविधा बॅंक ऑफ बडोदामध्ये सुरू झाली आहे. 

महापालिकेने ऑगस्ट २०१८ मध्ये येस बॅंकेत खाते उघडले होते. तेव्हापासून वसूल होणारी दैनंदिन रक्कम येस बॅंकेत जमा व्हायची. हिंजवडी, वाकड परिसरातील आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांकडून असंख्य नागरिक ऑनलाइन यंत्रणेचा वापर करायचे.

महापालिकेने येस बॅंकेतील ‘ट्रान्झॅक्‍शन’ गुरुवारी रात्री १२ वाजल्यापासून थांबविले. त्याऐवजी बॅंक ऑफ बडोदामध्ये भरणा करण्यास सुरवात केली आहे, मात्र ऑनलाइन सुविधा सुरू झालेली नाही. यासंदर्भात पालिकेचे मुख्य लेखाधिकारी जितेंद्र कोळंबे यांनी सांगितले की, ‘‘बॅंक ऑफ बडोदाच्या ऑनलाइन सुविधा पाहणाऱ्या पथकाला पालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागात बोलाविण्यात आले आहे. ही सुविधा सुरू करण्यासाठी थोडा वेळ लागतो.’’

...म्हणून येस बॅंकेत खाते
ज्या खासगी बॅंकेचे नक्त मूल्य चार हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असते, अशा बॅंकेत सरकारी संस्थेला खाते उघडता येते. तशा आशयाचा २०१५ मधील राज्य सरकारचा अध्यादेश आहे. त्यानुसारच महापालिकेने २०१८ मध्ये येस बॅंकेत खाते उघडले होते, असे कोळंबे यांनी सांगितले.

चिंचवडमध्ये खातेदारांची झुंबड
‘अहो, माझ्या भावाच्या मुलीच्या लग्नासाठी पैसे हवे होते. या महिनाअखेरीला लग्न आहे. आता काय करू, माझ्या बॅंकेचा गृहकर्जाचा हप्ता थकला आहे. त्यामुळे कर्जदार बॅंकेकडून कधी हप्ता भरता, असे फोन सुरू झाले आहेत...’ येस बॅंकेच्या चिंचवड शाखेबाहेर शनिवारी हेच ऐकायला मिळत होते. ग्राहक एकमेकांशी बोलून आपले दुःख हलके करण्याच्या प्रयत्नात होते. बॅंकेच्या वतीने ग्राहकांच्या शंकांना उत्तरे देण्यासाठी एक अधिकारी शाखेबाहेर नेमण्यात आला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com