पुण्यातील 'या' 7 तालुक्यात अजुनही मुलगी 'नकोशी'च

गजेंद्र बडे
Monday, 3 February 2020

गतवर्षीच्या तुलनेत जिल्ह्यातील सरासरी मुलींच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याआधीची तीन वर्षे म्हणजेच 2016, 17 आणि 28 मध्ये जिल्ह्यातील मुलींच्या सरासरी प्रमाणातही मोठी घट झाली होती. जिल्ह्याच्या सरासरीत वाढ झाली असली तरी 2001 आणि 2011 च्या जनगणनेच्या तुलनेत कमीच आहे

पुणे : वंशाचा दिवा म्हणून मुलगाच झाला पाहिजे, या हट्टापायी पुणे जिल्ह्यातील प्रगत समजल्या जाणाऱ्या बारामती, इंदापूर, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी आणि पुरंदर या सात तालुक्‍यांत आजही मुलगी "नकोशी' झाली आहे. या तालुक्‍यांमध्ये दर हजारी पुरुषांमागील मुलींच्या प्रमाणच प्रचंड घटझाली असून, हे प्रमाण नऊशेच्या आत आले आहे. पुरंदर तालुक्‍यात दर हजारी पुरुषांमागे सर्वांत कमी म्हणजेच केवळ 822 मुली आहेत.

 

येत्या 24 तासांत महाराष्ट्रात 'या' ठिकाणी पावसाची शक्यता...
 

दरम्यान, गतवर्षीच्या तुलनेत जिल्ह्यातील सरासरी मुलींच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याआधीची तीन वर्षे म्हणजेच 2016, 17 आणि 28 मध्ये जिल्ह्यातील मुलींच्या सरासरी प्रमाणातही मोठी घट झाली होती. जिल्ह्याच्या सरासरीत वाढ झाली असली तरी 2001 आणि 2011 च्या जनगणनेच्या तुलनेत कमीच आहे .यानुसार 2015-16 आणि 2016-17 मध्ये प्रत्येकी 884 आणि 2017-18 मध्ये तर त्यापेक्षाही निच्चांकी म्हणजेच केवळ 873 मुली असे हे प्रमाण घटले होते मात्र, त्यात 2018-19 मध्ये सुधारणा झाली असून, या वर्षात मुलींचे प्रमाण b919 झाले आहे. हेही प्रमाण सन 2011 च्या जनगणनेच्या तुलनेत खूपच घटलेले दिसते आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून हे विदारक वास्तव पुढे आले आहे. 2001 च्या जनगणेनुसार दर हजारी मुलांमागे 947 तर 2011 मध्ये 933 मुली होत्या.

आणखी दोन संशयित रुग्ण नायडू रुग्णालयात दाखल

मुलींचे प्रमाण घटलेले तालुके
बारामती --- 890
इंदापूर --- 858
जुन्नर --- 866
खेड --- 883
मावळ --- 877
मुळशी --- 851
पुरंदर --- 822

#PuneCrime : तळजाई वसाहतीत ५० गाड्यांची तोडफोड

जिल्ह्याचे मागील पाच वर्षांचे सरासरी प्रमाण (दर हजारी)
- 2014-15 --- 900
- 2015-16 --- 884
- 2016-17 --- 884
- 2017-18 --- 873
- 2018-19 --- 909
- 2019-20 --- आकडेवारी येणे बाकी

2011 च्या जनगणनेच्या तुलनेत पुणे जिल्ह्यात दर हजारी पुरुषांमागील प्रमाणात घट झाली आहे. याआधीच्या सलग दोन वर्षात तर हे प्रमाण 884 इतके खाली आले होते. परंतु जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने मुलींच्या जन्मांबाबत जनजागृती आणि अन्य उपाययोजना करण्यात येत आहेत.
त्यामुळे आता गतवर्षीच्या तुलनेत त्यात सुधारणा झाली आहे.
 
- डॉ. भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: still don't want girl In the seven talukas of the pune district