esakal | ऑक्सिजनवरील रूग्णांचा जीव वाचवण्यासाठी दमछाक; वीजपुरवठा सहा तास बंद

बोलून बातमी शोधा

oxygen cylender

ऑक्सिजनवरील रूग्णांचा जीव वाचवण्यासाठी दमछाक; वीजपुरवठा सहा तास बंद

sakal_logo
By
टीम सकाळ

पुणे : पावसाळी कामे करण्यासाठी महावितरणने आज वीजपुरवठा बंद ठेवला अन् बिबवेवाडी ते कात्रज दरम्यान असलेल्या रूग्णालयात दाखल असलेल्या साडेतीनशे ते चारशे रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी डॉक्टरांची दमछाक झाली. रूग्णालयातील पंख्यांपासून ते अन्य सर्व विजेचे उपकरणे बंद करून पॉवर बॅकॲपच्या मदतीने ऑक्सिजनचा पुरवठा करीत रुग्णांचा जीव वाचविण्याची ही लढाई तब्बल सहा तास सुरू होती. अखेर दुपारी तीनच्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर डॉक्टरांचा जीव भांड्यात पडला.

बिबवेवाडी ते कोंढवा दरम्यान पाच ते सहा रुग्णालये आहेत. बिबवेवाडी येथील ईएसआय हॉस्पिटल ते कोंढव्यातील हॉस्पिटल दरम्यान असलेल्या या रुग्णालयांमध्ये सुमारे पाचशे ते साडेपाचशे रूग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. त्यापैकी साठ ते सत्तर टक्के रूग्ण हे ऑक्सिजन बेडस्‌वर आहेत. तर दहा टक्के रूग्ण हे व्हेंटिलेटर बेड्‌सवर आहेत. आज सकाळी नऊच्या सुमारास या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. रूग्णालयांनी महावितरणशी संपर्क साधला, परंतु त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. थोड्या वेळेत पुरवठा सुरळीत होईल, या आशेवर डॉक्टर राहिले. पण दुपारपर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नाही. बऱ्याच वेळानंतर झाडांच्या फांद्या छाटण्यासाठी महावितरणकडून वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला असल्याची माहिती रुग्णालयांना महावितरणकडून देण्यात आली. मात्र, सकाळी नऊला बंद केलेला वीजपुरवठा दुपारी तीन नंतर सुरू झाला.

हेही वाचा: हाताला नाही काम, तरी मिळाले दाम! मजुरांना प्रत्येकी पाच हजारांची मदत

या कालवधीत वीजपुरवठा नसल्यामुळे रुग्णांना ऑक्सिजन देण्यात अनेक अडथळे आले. त्यावर पर्याय म्हणून काही रूग्णालयांनी बॅकअपच्या मदतीने ऑक्सिजन कंन्सेट्रेटरवर रुग्णांवर उपचार सुरू ठेवले. त्यासाठी रूग्णालयातील अन्य उपकरणे बंद करून, वीजबचत करण्यात आली. त्यामुळे रुग्णांचे जीव वाचविताना डॉक्टरांची सुरू असलेली धडपड थांबली.

सध्या ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. रुग्णालयांना मागणीच्या तुलनेत चाळीस ते पन्नास टक्केच ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. त्यावर पर्याय म्हणून ऑक्सिजन कॅन्सेट्रेटर मशिनचा वापर केला जात आहे. ही मशिन विजेवर चालते. त्याला पॉवर बॅकअपची सोय नाही. वीजपुरवठा खंडित झाल्यावर या मशिनच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार करताना अडचणी येतात.

''महावितरणकडून दरवर्षी पावसाळापूर्व कामे करण्यात येतात. आज बिबवेवाडी ते कोंढवा दरम्यान रस्त्यावरील झाडाच्या फांद्यांची छटाईचे काम नियोजित करण्यात आले होते. त्यासाठी वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला होता.''

-राजेश बिजवे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, महावितरण

''सकाळी गेलेली वीज दुपारी तीनला आली. सध्या ऑक्सिजनचा तुटवडा आहे. त्यामुळे काही रुग्णांना ऑक्सिजन कॅन्सेट्रेटर वापरून उपचार सुरू आहेत. वीज नसल्यामुळे हे मशिन देखील वापरण्यात अडचणी आल्या.''

- डॉ. रवींद्र छाजेड

हेही वाचा: जपानमधील कोरोना रुग्णांवर करणार आयुर्वेदाची क्लिनिकल ट्रायल