विद्यार्थ्यांमध्ये ‘डीएलएड’ अभ्यासक्रमाबाबत उदासीनता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

student

विद्यार्थ्यांमध्ये ‘डीएलएड’ अभ्यासक्रमाबाबत उदासीनता

पुणे : शिक्षक होण्यासाठी आवश्यक असणारे ‘डी.एल.एड.’चे शिक्षण घेऊनही नोकरीची हमी नसणे, शिक्षक भरती प्रक्रियेत होणारी दिरंगाई; तसेच भरती प्रक्रिया राबविली, तर पदभरतीसाठी द्यावे लागणारे पैसे, अशा विविध कारणांमुळे बारावीनंतरच्या ‘डी.एल.एड.’ अभ्यासक्रमाकडे विद्यार्थी पाठ फिरवत असल्याचे शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांसह भरती प्रक्रियेच्या प्रतीक्षेत असणारे उमेदवार आणि नागरिकांचे म्हणणे आहे.

गेल्या पाच वर्षात डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन म्हणजेच डी.एल.एड अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. हे अधोरेखित करणारे ‘‘डीएलएड’कडे विद्यार्थ्यांची पाठ’ या शीर्षकाखाली वृत्त ‘सकाळ’ने रविवारी प्रसिद्ध केले होते.

page

page

यावर शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांसह अन्य नागरिकांनाही आपली मते नोंदविण्यासाठी व्हॉटस्‌ॲप’ क्रमांक देण्यात आला होता. त्याद्वारे शिक्षक होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या डी.एल.एड अभ्यासक्रमाकडे विद्यार्थी पाठ का फिरवत आहेत, याबाबत आपली मते मांडली आहेत. त्यातील काही मते प्रातिनिधिक स्वरूपात देण्यात येत आहेत.

हेही वाचा: कळंब तालुक्यातील १९ हजार शेतकऱ्यानी नोंदविला ऑनलाइन पीकपेरा

संजय सोमवंशी (मुख्याध्यापक, सुंदरबाई मराठे विद्यालय, खराडी) :

‘‘काही दशकांपूर्वी बारावीनंतर डी.एड (आताचे डी.एल.एड) केल्यानंतर लगेच शिक्षक म्हणून नोकरी मिळायची. त्यामुळे मुलांचा शिक्षक होण्याकडे कल वाढला होता. परंतु त्यानंतर डी.एड करूनही पात्रता परीक्षा आणि अभियोग्यता चाचणी देण्याचे धोरण आले. परंतु एवढ्या फेऱ्यांमधून जाऊनही नोकरीची हमी उमेदवारांना मिळत नसल्याने, आता गेल्या पाच-सहा वर्षांपासून डी.एल.एड अभ्यासक्रमाकडे उमेदवार पाठ फिरवू लागले आहेत. तसेच शिक्षण संस्थांची संख्या पाहता गुणवत्तापूर्ण शिक्षकांची कमतरता जाणवत असल्याचे वास्तव आहे.’’

शेखर चौधरी :

‘‘शिक्षकांची नोकरी म्हणजे स्वत:च्या पदरचे पैसे खर्च करणे आहे. सुरवातीला शिक्षक सेवक म्हणून कामावर घेतले जाते. दोन वर्षे साधारणत: दरमहा दोन हजार रुपये पगार दिला जातो. या पगारात विद्यार्थ्यांना शिकविण्याबरोबरच अनेक कार्यालयीन काम जास्त वेळ करावी लागतात. त्यानंतर शिक्षक म्हणून नोकरी मिळावी म्हणून पाच ते दहा लाख रुपये ‘डोनेशन’ची मागणी केली जाते.’’

हेही वाचा: महेश रोकडे बारामतीचे नवीन मुख्याधिकारी

संजय निकाळजे :

‘‘एकेकाळी ‘डी.एड’च्या प्रवेशासाठी खूप मोठी स्पर्धा असायची. परंतु आता चित्र अगदी वेगळे आहे. शिक्षक होण्यासाठी कोणीही तयार होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. शिक्षकांचा अनियमितपणे होणारा पगार, रखडलेली शिक्षक भरती प्रक्रिया, कोणत्याही शिक्षण संस्थेत गुणवत्तेनुसार नोकरी मिळणे कठीण असणे, शिक्षण संस्थांमध्ये ‘डोनेशन’ घेऊनच उमेदवारांची नियुक्ती होणे आणि विविध सरकारी धोरणे या प्रमुख कारणांमुळे नवोदित विद्यार्थी शिक्षक होण्याच्या शिक्षणाकडे पाठ फिरवत आहेत.

डॉ. संदीप अनपट :

‘‘एकीकडे शिक्षणाचा दर्जा ढासळत आहे. तर दुसरीकडे शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी सरकारकडून कोणतेही प्रयत्न होत नाहीत. डी.एड, बी.एड, टीईटी असे बहुसंख्य पात्रताधारक शिक्षक हे पद भरती होईल आणि आपल्याला कामाची संधी मिळेल, या आशेवर आयुष्यातील महत्त्वाची वर्षे वाया घालवीत आहेत. पदभरतीमध्ये संधी मिळालीच, तर मोजक्या पदांसाठी लाखो उमेदवारांमध्ये मोठी स्पर्धा पाहायला मिळते. सरकार आणि शिक्षण तज्ज्ञांनी याकडे डोळसपणे न बघितल्यास राज्याची शैक्षणिक स्थिती खूप विदारक होईल.’’

संदीप चौधरी :

‘‘विद्यार्थ्यांनी ‘डीएलएड’ अभ्यासक्रमाकडे पाठ फिरविल्याचे वास्तव असून याला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे. विनाअनुदानित तत्त्वामुळे विना पगार काम करून शिक्षकांच्या दोन पिढ्यांचे आयुष्य वाया गेले. शिक्षक भरतीत पारदर्शकता नसल्याने नोकरी मिळविण्यासाठी उमेदवारांना पैसे मोजावे लागत आहेत. पगार वेळेवर न होणे, सेवेत रुजू होऊनही शिक्षक म्हणून मान्यता न मिळणे, अशा विविध कारणांमुळे विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाकडे येत नाहीत.’’

धनंजय कुलकर्णी :

‘‘गेल्या अनेक वर्षापासून शिक्षक संच मान्यता प्रक्रियेत बदल होत आहेत. शिक्षक भरतीसाठी ‘पवित्र पोर्टल’सारखी कुचकामी यंत्रणा तयार केली आहे. शिक्षक मोठ्या संख्येने सेवानिवृत्त होतात, परंतु नवीन जागा भरल्या जात नाहीत. त्यामुळे शिक्षक होण्यासाठी आवश्यक असणारे शिक्षण घेण्यास कोणी तयारी नसल्याचे दिसते.’’

Web Title: Students Dled Syllabus

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune News