पुण्यात पाय ठेवताच घरच्यांना बघून आले गहिवरून; कोटाहून परतलेल्या विद्यार्थ्यांची आपबिती

ब्रिजमोहन पाटील
Saturday, 2 May 2020

- घरच्यांना बघताच आले गहिवरून
- कोटातून आलेल्या विद्यार्थ्यांनी सोडला सुटकेचा नि:श्वास
- 'लालपरी'ने बजावली महत्त्वाची भूमिका 

 

पुणे : "कोरोना'चा प्रभाव वाढत चालला होता, पुण्यात येण्यासाठी रेल्वेचे आरक्षण केले, पण सर्व गाड्या रद्द झाल्या, क्लास ही बंद झाले... एक महिना कसाबसा काढला, पण घरच्या आठवणीने व्याकुळ होऊन अभ्यासात मन लागेना... आपण घरी कधी जाऊ या प्रश्नाचे उत्तर मिळत नसल्याने निराशा निर्माण व्हायची... अखेर क्लासमधून परतीच्या प्रवासासाठी अर्ज भरण्याची सूचना आली अन आशेचा किरण निर्माण झाला. आम्हाला घेण्यासाठी खास एसटी महामंडळाची 'लाल परी' आली.. १७ तासांचा प्रवास करून पुण्यात पाय ठेवताच घरच्यांना बघून गहिवरून आले... अन सुटकेचा निश्वास सोडला... 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
हा अनुभव आहे नीट, जेईईच्या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी 'कोटा'येथे गेलेल्या विद्यार्थ्यांचा. शनिवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास ४ बस मधील ७४ विद्यार्थी-विद्यार्थीनी स्वारगेट बस स्थानकात पोहचले. या विद्यार्थ्यांशी 'सकाळ'ने संवाद साधला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
साक्षी वानी ही दिवाळीपासून कोटा येथे 'नीट'चा क्लास करत होती. तेथील अनुभव सांगताना साक्षी म्हणाली, " कोरोनाची साथ आल्यानंतर प्रचंड घाबरले होते. पुण्यात ही प्रभाव वाढत होता. क्लास बंद झाल्याने पुण्यात येण्यासाठी दोन वेळा रिझर्वेशन केले, पण रद्द झाले. आई बाबाही चिंतेत होते. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशातील विद्यार्थ्यांची जाण्याची सोय करण्यात आली, त्यामुळे हाॅस्टेलमध्ये खुप कमी जण राहिले. टेंशन मुळे अभ्यासात मन लागत नव्हते. त्यामुळे ट्विटरवरून आम्ही राज्य सरकारला विनंती केली. अखेर आमची घरी यायची व्यवस्था झाली. त्यावेळी खुप आनंद झाला. आम्ही सुरक्षीत पुण्यात आलो, याबद्दल एसटी महामंडळाचे आणि चालकांचे खुप आभार. "

पुणेकरांनो, सावधान! कोरोनाच्या बळींचे झालंय शतक

स्नेहा झा म्हणाली, "जुलै महिन्यापासून मी कोट्यातच होते. लाॅकडाऊन नंतर मेस बंद झाल्याने आमची खुप गैरसोय झाली. कसे तरी जेवणाची व्यवस्था करू लागलो. इतर राज्यातील विद्यार्थीनी निघून गेल्यावर हाॅस्टेलमध्ये कोणीच नव्हते, खुप भिती वाटत होती. काही दिवसांपूर्वी इंस्टिट्यूटमधून पुण्याला जाण्यासाठी अर्ज भरण्यास सांगितले. त्यावेळी मोठा दिलासा मिळाला. आमचा अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे, आता रिव्हीजन सुरू आहे. सोबत पुस्तके असल्याने पुढील दोन दिवसात अभ्यास सुरू करेन. |

स्ट्रेस कमी करायचाय? घरबसल्या करा ऑनलाईन योग ध्यानसाधना

रस्त्यात अनेक ठिकाणी तपासणी 
शुक्रवारी पहाटे कोटा बसस्थानकावर आमची आरोग्य तपासणी करण्यात आली. सकाळी साडे सातला प्रवास सुरू झाला. एका सिटवर एकालाच बसविले होते. मानात आनंद होताच, पण धडधडही होती. प्रवासात राजस्थान मधील मध्यप्रदेशात व महाराष्ट्रात प्रवेश केल्यावर अनेक ठिकाणी चेकपोस्टवर बसची तपासणी झाली. कोपरगाव येथे आमची आणखी एकदा तपासणी झाली. ड्रायव्हरने १२ वाजेपर्यंत स्वारगेटला जाऊ असा निरोप घरच्यांना द्या असे सांगितले. स्वारगेटवर येताच आमची व्यवस्थित तपासणी झाली. हा अनुभव खुपच वेगळा आणि अवघड होता, असे साक्षीने सांगितले. 

"कोटा येथून ७४ विद्यार्थी आज पहाटे एसटी महामंडळाच्या बसने पुण्यात आले. स्वारगेट येथे विद्यार्थी व  ८ ड्रायव्हर यांची पुणे महानगरपालिकेच्या पथकाने आरोग्य तपासणी केली. सर्व विद्यार्थी निरोगी असल्याने होम क्वारंटाईनचा शिक्का मारून घरी पाठविले. तसेच आठ बस निर्जंतुकीकरण करून धुळ्याला पाठवून देण्यात आल्या. "
- अमृत नाटेकर, उपजिल्हाधिकारी

"स्वारगेट येथे तीन पथकांनी विद्यार्थ्यांची तपासणी केला, सर्वजण व्यवस्थित आहेत. पुढील १४ दिवसात त्यांच्यात कोणतीही लक्षणे आढळली तर त्वरीत महापालिकेच्या दवाखान्यात  संपर्क साधावा अशा सूचना दिल्या आहेत."
- डाॅ. वैशाली जाधव, सह आरोग्य प्रमुख, पुणे मनपा

- कोटा ते पुणे सलग १७ तासाचा प्रवास
- रस्त्यात अनेक ठिकाणी तपासणी
- ७४ विद्यार्थी सुखरूप घरी
-एसटी चालकांनी बजावली महत्वाची भूमिका
- घरात एका खोलीत बंद असले तरी छान वाटतय


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The students trapped in Kota finally reached Pune safely