विद्यार्थी पुण्यात आले पण महाविद्यालयांना टाळेच!

ब्रिजमोहन पाटील
Thursday, 21 January 2021

पुणे विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना याबाबत विचारले असता अजून पर्यंत आम्हाला काहीही कळविण्यात आलेले नाही असे सांगितले.

पुणे : महाविद्यालये सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून 20 तारखेपर्यंत निर्णय घेऊ अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली होती. महाविद्यालये सुरू होतील या आशेने गावाकडे असलेले विद्यार्थी पुण्यात दाखल झाले आहेत. पण 20 तारीख उलटून गेली तरी अद्याप निर्णय झालेला नाही.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 11 जानेवारीपासून महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावर राज्याच्या उच्च शिक्षण खात्याने शासनाची परवानगी न घेता महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय कसा काय घेतला यावर खुलासा करण्यासाठी उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांनी पत्र पाठवले होते. त्यामुळे पुणे विद्यापीठाला एक पाऊल मागे घेऊन शासनाच्या पुढील आदेशानुसार महाविद्यालये सुरू केले जातील असे स्पष्ट केले होते. दरम्यान त्यानंतर उदय सामंत यांनी फेसबुक लाईव्हवर 20 तारखेपर्यंत निर्णय घेतला जाईल असे सांगितले होते.

भारत-अमेरिका मैत्रीचं नवं पर्व; PM मोदींचा US राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना खास संदेश!​

राज्यातील इयत्ता 5वी ते 12 पर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत, पण महाविद्यालये सुरू झालेले नाहीत. विज्ञान शाखेसह व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे प्रॅक्‍टीकलचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. पहिल्या टप्प्यात सर्व नियमांचे पालन करून किमान प्रयोगशाळा तरी सुरू झाल्या पाहिजेत अशी मागणी विद्यार्थी, प्राध्यापकांकडून होत आहे. 20 तारखेपर्यंत राज्य सरकारकडून निर्णय होईल व पुढच्या काही दिवसात महाविद्यालये सुरू होतील यामुळे अनेक पुण्याबाहेरील विद्यार्थी शहरात दाखल झाले आहेत. पण शासनाला निर्णय घेता आलेला नाही.

पुणे विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना याबाबत विचारले असता अजून पर्यंत आम्हाला काहीही कळविण्यात आलेले नाही असे सांगितले. तर राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांनीही अद्याप निर्णय झाला नसल्याचे सांगितले

Video: भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनी शपथ घेतली अन् इतिहास घडला!

"20 तारखेपर्यंत निर्णय होणार असल्याने मी पुण्यात आले आहे, पण अजून काहीच निर्णय झालेला नाही. वर्गातील थेट शिकवणे महत्वाचे आहे, पण ते शक्‍य नसेल तर किमान प्रॅक्‍टिकल तरी सुरू केले पाहिजेत. याबाबत लवकर निर्णय घेऊन आमचे नुकसान टाळावे.''
- भक्ती पाटील, तृतीय वर्ष, बीएससी

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students from village have arrived in Pune in hope of starting colleges