तुमच्याशी लग्न केले हीच माझी चूक... 

सु. ल. खुटवड 
Thursday, 14 January 2021

बायकोला वाढदिवसाचे सरप्राईज गिफ्ट द्यावं म्हणून काल आम्ही साड्यांच्या दुकानात गेलो. तेथील मनमोहक साड्या आणि त्याहून मनमोहक ग्राहक पाहून आमची चांगलीच तंद्री लागली.

"महिला कधीच आपल्या चुका मान्य करत नाहीत' हे वाक्‍य आम्ही अनेकदा ऐकलंय. मात्र, त्यात काहीही तथ्य नाही, असा आमचा अनुभव आहे. माझी बायको तर रोजच आपली चूक मान्य करत असते. "या माणसाशी लग्न केलं, ही माझी खूप मोठी चूक झाली' असे ती नेहमी म्हणते. त्यावेळी मला तिचा अभिमान वाटतो. स्वतः:ची चूक कबूल करणे, हे मोठ्या मनाचे लक्षण आहे. कालही तिने आपली चूक कबूल केली.

बायकोला वाढदिवसाचे सरप्राईज गिफ्ट द्यावं म्हणून काल आम्ही साड्यांच्या दुकानात गेलो. तेथील मनमोहक साड्या आणि त्याहून मनमोहक ग्राहक पाहून आमची चांगलीच तंद्री लागली. परंतु काउंटरवरील व्यक्तीने दोन-तीनदा चुटकी वाजवून आम्हाला जमिनीवर आणलं. विक्रेत्याने आमच्यासमोर साड्यांचा ढीग टाकला. सगळ्याच साड्या उत्तम होत्या. मात्र, त्यातील कोणती साडी घ्यावी, याबाबत आमचा गोंधळ उडाला. सुदैवाने आमच्या सोसायटीतील सोनल वहिनी नेमक्‍या तिथे आल्या. त्यांना आम्ही अडचण सांगितली. त्यांनी मदतीचा हात पुढे केल्याने मनावरील ओझं हलकं झालं. त्यांनी बायकोसाठी मोरपंखी रंगाची पाच हजारांची साडी पसंत केली व स्वत:साठीही दहा हजार रुपयांची पैठणी घेतली. बिलिंग काउंटरवर गेल्यानंतर आपल्याकडे फक्त पाचच हजार रुपये असल्याचे त्यांच्या लक्षात आले. परंतु आम्ही त्यांना धीर दिला. आम्ही सगळे बिल क्रेडिटकार्डद्वारे भरणार असल्याचे सांगितले व नंतर दहा हजार रुपये आम्हाला द्या, असे सांगितले. त्यांनीही होकार दिला. बिल भरल्यानंतर वहिनी पैठणी घेऊन गेल्या व आम्ही बिल व मोरपंखी साडी घेऊन घरी आलो.

 पुण्यातील इंजिनिअरिंगच्या तरुणीला फास्ट बाईक चालवणं पडलं महागात!​

बायको आपल्यावर खूष होणार, याची आम्हाला खात्री होती. घरी आल्यानंतर तिला डोळे बंद करायला सांगून, तिच्या हातात साडी ठेवली. साडीचे खोकं पाहून ती कमालीची खूष झाली. मात्र, आतील साडी पाहिल्यानंतर तिचा चेहरा पडला. "अहो, याच रंगाची साडी मी दिवाळीलाच घेतली होती ना. परत तोच रंग कशाला आणलात?' कपाळाला आठ्या चढवत ती म्हणाली. साडीची किंमत विचारल्यावर आम्ही खरी तीच किंमत सांगितली. यावर तिला मोठा धक्का बसला. "अहो, त्याच दुकानातून मी ही साडी दोन हजारात आणली होती,' असे म्हणून तिने आम्हाला बिलही दाखवले. "काय माणूस आहे? दोन महिन्यांपूर्वी बायकोने कोणत्या रंगाची साडी घेतलीय. केवढ्याला घेतलीय, हेही माहिती नाही. यात तुमचा दोष नाही. मी तुमच्याशी लग्न केले, हीच माझी मोठी चूक झाली,' असे म्हणून बायको एकमेकांवर भांडी आदळत ती घासू लागली. दुसऱ्या दिवशी सोनलवहिनी घरी आल्या व बायकोकडं कालचं बिल मागू लागल्या. "अहो ताई, काल आम्ही दोघांनीच तुम्हाला साडी पसंत केली. त्यात मला एक पैठणी फारच आवडली. पण नेमके माझ्याकडे दहा हजार रुपये नव्हते. पण भाऊजी म्हणाले "वहिनी काळजी करू नका. मी क्रेडिटकार्डने बिल भरतो' तसे त्यांनी भरलेही. मात्र घरी आल्यानंतर पैठणीचा काठ दोन ठिकाणी फाटल्याचे लक्षात आले म्हणून म्हटलं पैठणी बदलून आणावी. त्यासाठी बिल हवंय. "नेमकं त्याचवेळी आम्ही घरात प्रवेश केला. पुढे काय होणार, या कल्पनेनेच आमच्या अंगाला घाम फुटला. आम्ही निमूटपणे बिल वहिनींच्या हातात टेकवले. त्या गेल्यानंतर बायकोने रणचंडिकेचा अवतार धारण केला. "बायकोला वाढदिवसाला दोन हजारांची हलकी साडी घेताय आणि एका परक्‍या बाईला दहा हजारांची पैठणी घेताय. कुठं फेडाल ही पापं? तुमच्याशी लग्न केलं, ही माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठी चूक आहे,' असे म्हणून हातातील लाटणं तिनं आमच्या दिशेने भिरकावलं. 

 IAF Recruitment 2021: १२वी पास उमेदवारांनो, एअरमन पदांसाठी निघाली भरती!​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: su la Khutwad write article marriage