सलग तिसऱ्यांदा केली 1 कोटीहून अधिक दंड वसुली; पहा कोण आहेत ते?

प्रफुल्ल भंडारी
शनिवार, 1 फेब्रुवारी 2020

विनातिकीट प्रवास करणारा विचलित असतो व तिकीट तपासनीस आल्यावर त्याच्या चेहऱ्यावरील बदलले हावभाव आणि देहबोलीवरून आम्ही त्याला पकडतो. तिकीटाची मागणी केल्यावर सतत विनातिकीट प्रवास करणारे अंगावर धावून जातात, वाद होतात, अप्रिय प्रसंगाला सामोरे जावे लागते परंतु, आम्ही रेल्वे सुरक्षा दलाच्या सहकार्याने परिस्थिती कौशल्याने हाताळतो.

दौंड (पुणे) : ''रेल्वे खात्यात फिटरच्या हाताखाली हेल्पर म्हणून रूजू झालो. कामामुळे अंग काळं होत होतं परंतु त्याची कधीही लाज बाळगली नाही. आज तिकीट निरीक्षक म्हणून विना तिकीट प्रवाशांकडून दंड वसुली करताना अप्रिय प्रसंगांना सामोरे जावे लागते. वसुलीचे काम करताना धोके आहेत `बट आय अॅम हॅपी`'', अशी प्रांजळ भावना मध्य रेल्वेचे सर्वाधिक वसुली करणारे तिकीट निरीक्षक सुभाष गलांडे यांनी व्यक्त केली आहे.

पुण्यात मेट्रोच्या कामाची धडकी; वाहनचालक, पादचाऱ्यांचा जीव मुठीत 
 

मध्य रेल्वेने १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१९ दरम्यान विना तिकीट प्रवाशांकडून १९२. ५१ कोटी रूपये दंड वसूल केला. त्यापैकी २२६८० प्रकरणात तब्बल १ कोटी ५१ लाख २२ हजार २७० रूपयांची दंड वसुली मलठण (ता. दौंड) येथील तिकीट निरीक्षक सुभाष गलांडे यांनी केली आहे. याबद्दल मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांच्या हस्ते प्रमाणपत्र व रोख पाच हजार रूपयांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. सलग तिसऱ्या एक कोटी रूपयांहून अधिक दंड वसुली गलांडे यांनी केली आहे. 
  
 
सुभाष बलभीम गलांडे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मलठण येथील गुरूदेव दादोजी कोंडदेव विद्यालयात झाले तर, पदवी पर्यंतचे शिक्षण दौंड तालुका कला व वाणिज्य महाविद्यालयात झाले. त्यांचे वडील रेल्वे खात्यात पॅाइंट्समन असल्याने अनुकंपा तत्वार १९९९ मध्ये त्यांची दौंड येथे इलेक्ट्रिक विभागात हेल्पर म्हणून रूजू झाले. पदवीधर असले तरी इलेक्ट्रिक फिटरच्या हाताखाली रेल्वे स्टेशनवरच्या लाइट चालू व बंद करणे, डब्ब्यांमधील उपकरणांचे फिटिंग करणे, डब्ब्यांमधील पंखे पुसून दुरूस्त करणे, आदी कामे त्यांनी केली आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, दिवस व रात्रपाळी करण्याबरोबर सतत अभ्यास करत डिसेंबर २००६ मध्ये खात्यांतर्गत परिक्षेत उत्तीर्ण होऊन त्यांची तिकीट तपासनीस (टीसी ) म्हणून निवड झाली. सध्या मध्य रेल्वेच्या प्रधान वाणिज्य व्यवस्थापकांच्या भरारी पथकात सुभाष गलांडे हे ट्रेन तिकिट इन्सपेक्टर म्हणून ते कार्यरत आहेत. मुंबई, नागपूर, भुसावळ, पुणे व सोलापूर या रेल्वेच्या पाच विभाग त्यांचे कार्यक्षेत्रात आहे. 

न्यायालयाने केला प्राजक्ता माळीविरुद्धचा खटला रद्द
 

"परिश्रम व अभ्यासू वृत्ती असल्यास यश निश्चित मिळते. आजच्या युवा वर्गाने देखील काम करताना कोणतीही लाज बाळगू नये,'' असे आवाहन सुभाष गलांडे यांनी केले.

सारथीच्या माध्यमातून मराठा समाजाची होत असलेली बदनामी थांबवा : संभाजीराजे

त्यांना देहबोलीवरून पकडतो....
विनातिकीट प्रवास करणारा विचलित असतो व तिकीट तपासनीस आल्यावर त्याच्या चेहऱ्यावरील बदलले हावभाव आणि देहबोलीवरून आम्ही त्याला पकडतो. तिकीटाची मागणी केल्यावर सतत विनातिकीट प्रवास करणारे अंगावर धावून जातात, वाद होतात, अप्रिय प्रसंगाला सामोरे जावे लागते परंतु, आम्ही रेल्वे सुरक्षा दलाच्या सहकार्याने परिस्थिती कौशल्याने हाताळतो.
- सुभाष गलांडे , तिकीट निरीक्षक , मध्य रेल्वे
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Subhash Galande recovers more than Rs 1 crore fine from Central Railway for the third time