पंजाबमधील स्थिती बिघडविण्याचा कट

पंजाबमधील स्थिती बिघडविण्याचा कट
Published on

नांदेड, ता. १४ : ‘माझ्यावरील हल्ला हा पंजाबची स्थिती बिघडवण्याचा कट असून पंजाबवर नियंत्रण मिळवणे, त्या राज्यातील सामाजिक सलोखा बिघडवणे हे काही शक्तींचे मिशन आहे’, असे मत पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री, शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांनी केले. दरम्यान, बादल यांच्यावर हल्ला करणाऱ्या जसपाल सिंग याला मुदखेड न्यायालयाने २४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
मुगट (ता. मुदखेड) येथील मातासाहेब गुरुद्वारा परिसरात बादल यांच्यावर गुरुवारी (ता. १३) जीवघेणा हल्ला झाला होता. त्यात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. येथील खासगी रुग्णालयात शस्त्रक्रियेनंतर आणि प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर बादल यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘सलोखा बिघडविणाऱ्या शक्तींसमोर माझे वडील प्रकाशसिंग बादल कधीही झुकले नाहीत. सर्व समाज आणि समुदाय एकत्र राहावेत, यासाठी ते नेहमी ठामपणे उभे राहिले. मुख्यमंत्री असताना त्यांनी सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केले. या शक्तींनी वर्षभरापूर्वीही माझ्यावर सुवर्णमंदिर परिसरात हल्ला केला होता आणि आता पुन्हा हल्ल्याचा प्रयत्न केला आहे. शिरोमणी अकाली दलाचा अध्यक्ष या नात्याने पंजाबची स्थिती बिघडवण्याचा प्रयत्न कधीही होऊ देणार नाही.’’
हल्ल्यानंतर सुरक्षेसाठी तत्पर राहिलेल्या यंत्रणेतील सर्वांचे, प्रकृतीची विचारपूस करणाऱ्यांचे बादल यांनी आभार मानले. आपल्यावर झालेल्या हल्ल्याची कसून चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. हल्ल्यापासून सुखबीरसिंग बादल यांचा बचाव करताना येथील पोलिस निरीक्षक संतोष केंद्रे जखमी झाले होते. त्यांना उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

गुरुद्वारात विशेष अरदास
---
तख्त साहिब गुरुद्वारात अखंडपाठाची धार्मिक वातावरणात सांगता झाली. खासदार हरसिमरत कौर बादल यांनी लंगर साहिब गुरुद्वारात धार्मिक सेवा बजावत गुरूघराचे आशीर्वाद घेतले. सुखबीरसिंग बादल यांच्यावरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बादल कुटुंबीयांच्या आरोग्य व सुख-समाधानासाठी विशेष अरदास करण्यात आली. अखंडपाठ सांगतेनंतर विविध धार्मिक विधी झाले. हरसिमरतकौर बादल यांनी श्रद्धेने गुरुद्वारात माथा टेकला, निशाण साहिबला चोला चढवून गुरुद्वारातील सेवा, भाविकांसोबत लंगर सेवेतही सहभाग घेतला.


जसपाल सिंगला पोलिस कोठडी
--
बादल यांच्यावर हल्ला करणाऱ्या जसपाल सिंग याला तत्काळ अटक करण्यात आली होती. त्याविरुद्ध मुदखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्याला आज मुदखेड न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याला २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. हल्ल्यामागील उद्देश, पूर्वतयारी, हल्ल्याची पार्श्वभूमी, अन्य कोणाचा सहभाग आहे का आदींचा नांदेड पोलिस आणि दहशतवादविरोधी पथकाकडून (एटीएस) तपास केला जात आहे.

NDD26B01708, NDD26B01709

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com