मनाचिये वारी : विवेकी विचारांनी भावनांना आवर घालूया

स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज
मंगळवार, 23 जून 2020

ज्ञानेश्‍वर महाराजांनी भक्तिमार्गाची वारकरी संप्रदायाची वाट अधिक उज्ज्वल केली. सकल संतांना घेऊन वारकरी पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीला जातात, त्या वेळी पालखीत साक्षात संत ज्ञानेश्‍वर महाराज आहेत, असा दृढ भाव प्रत्येक वारकऱ्याच्या मनात असतो.

Wari 2020 : ज्ञानेश्‍वर महाराजांनी भक्तिमार्गाची वारकरी संप्रदायाची वाट अधिक उज्ज्वल केली. सकल संतांना घेऊन वारकरी पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीला जातात, त्या वेळी पालखीत साक्षात संत ज्ञानेश्‍वर महाराज आहेत, असा दृढ भाव प्रत्येक वारकऱ्याच्या मनात असतो. या वारकऱ्यांचे संतांवर तसेच पांडुरंगावर किती प्रेम आहे, याचे वर्णन शब्दांत करता येणार नाही. ते प्रेम अनुभवायचे असेल तर पंढरीची वारीच करावी लागेल. असुविधेत सुविधा मानून शेकडो किलोमीटरची खडतर वाटचाल करीत वारकरी पंढरीत येतात. कोसळणारा पाऊस आणि चिखलमय वाट तुडवीत ते वारी पूर्ण करतात. त्यामागे भक्तीचा एकमेव धागा असतो.

मनाचिये वारी : वारीचा प्रवास अंतरंगातून करूया

महाराष्ट्राचे सामाजिक मन वारीशी एकरूप झालेले आहे. वारी ही वारकरी संप्रदायाची ऊर्जा आहे. यातून वारकऱ्यांना प्रेरणा मिळते. रक्ताच्या नात्यापेक्षा अधिक प्रेम वारकरी संतांवर आणि विठ्ठलावर करतो, हे वास्तव आहे. विठ्ठलाचे भक्त असंख्य आहेत, पण ते सर्वच वारी करतात असे नाही. नित्यनेमाने वारी करून जीवनाला नियम लावून घेणारेच खरे वारकरी...! यंदा वैश्‍विक महामारीमुळे वारी रद्द झाली, ही फार मोठी खंत वारकऱ्यांच्या जिवाला आहे. कोरोनामुळे वारकऱ्यांचे व्रत मोडले आहे. त्याचे दुःख वारकऱ्यांनाच माहीत. त्यातून विवेकाने तसेच काळाशी सुसंगत विचार करणारे किमान आपल्या भावनांना आवर घालू शकतात. मात्र, भक्तिप्रेमात चिंब झालेल्या लाखो वारकऱ्यांच्या वेदना त्यांच्या डोळ्यांतील आसवांमधून दिसून येतात. राज्यकर्त्या सरकारला केवळ भावनाविवश होऊन चालत नाही. त्याचा परिणाम काय होईल, हेही पाहायला लागते. वारी केल्यामुळे आजार फैलावला, तर त्याची मोठी किंमत मोजावी लागेल. तसेच, ज्याच्यासाठी वारी करतो, त्या पांडुरंगालाही ते निश्‍चितच आवडणार नाही, त्यामुळे वारकऱ्यांनी भावनांना आवर घालून वारी रद्दचा निर्णय मान्य केला. वारकऱ्यांनी मनाची समजूत काढणे, हाच यावरील उपाय आहे. आलेल्या परिस्थितीने खंतावून जाऊ नये. भगवंताच्या कृपेने हे संकट लवकर दूर होवो, असे मागणे विठ्ठलाकडे आपण सारे मागूया.

मनाचिये वारी : वारकऱ्यांच्या हृदयातच वसतो पांडुरंग

वारीची ही कित्येक शतकांची परंपरा, वारकऱ्यांची उद्विग्न भावना यांचा मेळ घालण्याचे मोठे आव्हान सकल वारकरी संप्रदायावर आहे. त्यामुळे कोणावरही टीकाटिपण्णी न करता, घरात बसून साधना करणे, हाच यातील उत्तम मार्ग आहे. वारकरी संप्रदाय हा अतिशय बुद्धिमान आहे, त्यामुळे भावनाविवश होऊन कोणीही चुकीचे पाऊल उचलणार नाही, याची खात्री आहे. सरकारच्या नियमांचे पालन करून वारकरी आपल्या गावातील मंदिरांमध्ये पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेऊन भावभक्ती व्यक्त करतील. कारण शिस्तप्रियता हा वारकऱ्यांचा गुण आहे, त्याला ते तडा जाऊ देणार नाहीत.
(शब्दांकन : शंकर टेमघरे)
 

मनाचिये वारी : जगाच्या सुखाचे मागणे, पांडुरंगाकडे मागूया

""माऊलींच्या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची सेवा हीच माऊलींची सेवा हाच सेवाभाव फलटणकर दरवर्षी जपतात. वारी नसल्याने यंदा आम्ही या सेवेपासून वंचित राहणार आहोत, याबाबत मनात खंत आहे. पण कोरोनाच्या वाढत्या प्रभावापुढे सध्या तरी इलाज नाही.''
- बबनराव निकम, फलटण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: swami govind dev giriji maharaj writes about wari