esakal | मिळकतकरात सवलत घेताय; ओला कचरा सोसायटीतच जिरवा
sakal

बोलून बातमी शोधा

ओला कचरा

मिळकतकरात सवलत घेताय; ओला कचरा सोसायटीतच जिरवा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : सोसायट्यांमध्ये निर्माण होणारा ओला कचरा सोसायटीतच जिरवणे आवश्‍यक आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने महापालिकेने सोसायट्यांकडे मोर्चा वळवला आहे. गांडूळ खत प्रकल्प बंद करून ओला कचरा बाहेर देणाऱ्या सोसायट्यांना नोटिसा बजावून त्यांच्याकडून दंड वसूल केला जात आहे. आतापर्यंत ४२० सोसायट्यांना नोटीस बजावून त्यांच्याकडून वर्षभरात तीन लाख ६५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

हेही वाचा: धक्कादायक;बहिणीची छेड काढली म्हणून डोक्यात दगड घालून हत्या;पाहा व्हिडिओ

महापालिकेकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, मिळकतकर विभागाकडे तीन हजार ९७० ठिकाणी गांडूळखत प्रकल्प आहेत. त्यापैकी सध्या एक हजार ५५४ प्रकल्प कार्यान्वित आहे. पण प्रकल्पावर जाणाऱ्या ओल्या कचऱ्याचे प्रमाण वाढल्याने सोसायट्यांचे प्रकल्प बंद पडले असल्याचा संशय प्रशासनाला आला. त्यानुसार प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांकडून सोसायट्यांची तपासणी केली जात आहे.

महापालिकेने १ सप्टेंबरपर्यंत १५५४ पैकी ४२० सोसायट्यांना नोटीस बजावली असून, त्यापैकी २२० सोसायट्यांवर कारवाई करून तीन लाख ६५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. २०० सोसायट्यांचे प्रकल्प सुरू असल्याचे कारवाई केली नाही. मात्र, महापालिकेच्या घनकचरा विभागाकडे किती सोसायट्यांना पहिली, दुसरी व तिसरी नोटीस दिली याची माहिती उपलब्ध नाही, ती क्षेत्रीय कार्यालयांकडेच आहे, असे सांगण्यात आले.

हेही वाचा: नारीच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात

"सोसायट्यांनी त्यांचा कचरा सोसायटीमध्येच जिरवणे आवश्‍यक आहे, त्यासाठी मिळकतकरात त्यांना सूट दिलेली आहे. पण अनेक सोसायट्या कचरा न जिरवता तो महापालिकेच्या कचरा प्रकल्पावर पाठवत आहेत. त्यामुळे सोसायट्यांची पाहणी करून प्रकल्प बंद असेल तर त्यांना नोटिसा बजावण्याची कार्यवाही सुरू आहे."

- अजित देशमुख, प्रमुख, घनकचरा व्यवस्थापन विभाग, पुणे महापालिका

"आमच्या सोसायटीमध्ये ११२ फ्लॅट आहेत. २००७ पासून आमचा कचरा प्रकल्प नियमितपणे चालू आहे. काही दिवसांपूर्वी महापालिकेने नोटीस दिली होती, त्यानंतर अधिकाऱ्यांनी पाहणी केली. पण, कचरा प्रकल्प सुरू असल्याने आमच्यावर कारवाई झाली नाही. कचरा प्रकल्प चालवताना काही अडचणी येतात. खत तयार झाल्यानंतर बागेत वापरले जाते. तसेच आम्हीच शेतकऱ्यांना पैसे देऊन खत घेऊन जाण्यासाठी सांगतो."

- विजय लायकर, इस्टेट मॅनेजर, साई पूरम, धायरी

हेही वाचा: Pune : अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार

  • पुण्यात निर्माण होणारा कचरा - सुमारे २१०० टन

  • सुका कचरा - १०५० ते ११५० टन

  • ओला कचरा - ७५० ते ८०० टन

  • सोसायट्यांमधील प्रकल्प - ३९७०

  • सध्या सुरू असलेले प्रकल्प - १५५४

मिळकतकरात सूट मिळते. त्यामुळे सोसायट्यांनी आवारातच कचरा जिरवणे गरजेचे आहे. याबाबत आपल्या प्रतिक्रिया नावासह कळवा. नंबर : ८४८४९७३६०२

loading image
go to top