esakal | बारामतीचे 500 बेड्सचे शासकीय रुग्णालय वर्षअखेरीस होणार तयार

बोलून बातमी शोधा

baramati hospital
वर्षअखेरीस बारामतीत होणार 500 बेड्सचे शासकीय रुग्णालय
sakal_logo
By
मिलिंद संगई, बारामती

बारामती : येथे होणारे शासकीय वैद्यकीय सर्वोपचार रुग्णालय या वर्षअखेरीपर्यंत पूर्णत्वास जाणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे यंदाचे दुसरे वर्ष असून त्याला संलग्न 500 बेडसचे आंतरराष्ट्रीय मानकानुसार उभारलेले सर्वोपचार रुग्णालय वेगाने पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग युध्दपातळीवर काम करत असून कोविडच्या पार्श्वभूमीवर हे रुग्णालय शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून हा प्रकल्प साकारला आहे.

हेही वाचा: Corona सक्रीय रुग्णांमध्ये बंगळूर अव्वल, पुणे दुसऱ्या स्थानावर

बारामती एमआयडीसीतील 23 एकर जागेवर वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय, होस्टेल व निवासस्थाने असा भव्य प्रकल्प साकारला आहे. संपूर्ण इमारतींचे क्षेत्रफळ बारा लाख स्क्वेअर फूटांचे आहे. या प्रकल्पात बारा इमारती उभारलेल्या असून सर्वोपचार रुग्णालयाची इमारत सात मजली तर वैदयकीय महाविद्यालयाची इमारत पाच मजली आहे. वसतिगृहाच्या पाच इमारती असून विद्यार्थी व विद्यार्थीनींसह परिचारिका यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. या शिवाय डॉक्टर्स व इतर कर्मचा-यांसाठी तीन, दोन व एक बेडरुमच्या सदनिका उभारलेल्या आहेत. या रुग्णालयात तेरा ऑपरेशन थिएटर्स आहेत. ही इमारत हरित स्वरुपाची असून हवा, प्रकाश पुरेसा यावा असा दृष्टीकोन ठेवून इमारत उभारलेली आहे. या ठिकाणी स्वतंत्र सांडपाणी प्रक्रीया प्रकल्प उभारण्यात आला आहे. या परिसरात 1600 झाडे लावली जाणार असून रेन वॉटर हार्वेस्टींग प्रणाली व सोलर सिस्टीमही विकसीत होणार आहे. हा प्रकल्प अग्निसूचक यंत्रणेने सज्ज असून कोठेही आग लागल्यास त्वरित त्याची माहिती मिळणार असून आगीपासून बचावासाठी पूर्ण प्रणाली कार्यान्वित केली आहे.

हेही वाचा: बारामती लोकसभा मतदार संघातील रस्त्यांसाठी 25 कोटींचा निधी मंजूर

सुरक्षेच्या दृष्टीने सर्व खबरदारी घेतली गेली आहे. वीजेचा कमीत कमी वापर करावा लागेल ही बाब नजरेसमोर ठेवून इमारत उभारलेली आहे. या प्रकल्पात 27 ऑटोमेटीक लिफ्ट आहेत. या ठिकाणी 222 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून प्रत्येक हालचालीवर रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथून लक्ष ठेवण्यात येणार आहे. इमारतीत छोटी पोलिस चौकीही करण्यात आली आहे. या महाविद्यालय व रुग्णालयासाठी जवळपास दोनशे कोटी रुपयांची यंत्रसामग्री हाफकीन संस्थे मार्फत खरेदीची प्रक्रीया सुरु झाली आहे. जागतिक स्तरावरील अत्याधुनिक यंत्रणा येथे कार्यान्वित होईल.

कोविड सेंटरसाठी 300 बेड-याच रुग्णालयातील 300 बेड कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनच्या सुविधेसह उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने सध्या युध्दपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. अत्यंत सुसज्ज व परिपूर्ण अशा इमारतीत सर्व साधनसामग्रीसह हे बेड तयार होतील, तेव्हा केवळ बारामतीच नाही तर नगर, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील रुग्णांनाही याचा मोठा दिलासा मिळणार आहे. पन्नास वर्षांची तरतूद-आगामी पन्नास वर्षात बारामती पंचक्रोशीत वाढणारी लोकसंख्या व निर्माण होणा-या आरोग्याच्या समस्या विचारात घेत अजित पवार यांनी दूरदृष्टी दाखवत 2013 मध्ये हा प्रकल्प सुरु केला होता. मधल्या काळात विविध अडचणींमुळे काम संथगतीने सुरु होते. आता मात्र पुन्हा या कामाने वेग घेतला असून वर्षअखेरीस हे रुग्णालय लोकांच्या सेवेसाठी सुरु करण्याचा मानस प्रशासनाकडून व्यक्त होत आहे.

हेही वाचा: जुन्नर : आरोग्य केंद्रातील महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांना धमकी