बेडच्या माहितीचे डॅश बोर्डच बेहोश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pmc dashbord

बेडच्या माहितीचे डॅश बोर्डच बेहोश

पुणे : रेल्वे, विमान व बस वाहतूक, थिएटर बुकिंग तसेच अकरावी प्रवेश किंबहुना लसीकरण नोंदणी हे सर्व ऑनलाइन पद्धतीने कार्यरत आहे. मात्र, उपलब्ध बेडची अचूक माहिती महापालिकेने आधुनिक तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या डॅश बोर्डवर नागरिकांना मिळत नाही, ही बाब शहरासाठी लाजिरवाणी आहे, अशी टीका शहर कॉंग्रेसने सोमवारी केली.

डॅश बोर्डवर अचूक माहितीचा अभाव आहे. ज्या ठिकाणी बेड उपलब्ध आहेत, असे दाखविले जाते तेथे नागरिक पोचल्यावर ते उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. हा अनुभव वारंवार नागरिकांना येत आहे, असे प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

हेही वाचा: हवामानातील बदलामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत; भाजीपाल्यासह फळ पिकेही धोक्यात

डॅश बोर्ड अद्ययावत ठेवणे हे तांत्रिक ज्ञान असलेल्या अभियंत्यांचे काम आहे. त्यासाठी आयटीमधील तज्ज्ञांचे महापालिका मार्गदर्शन घेऊ शकते; परंतु वैद्यकीय अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांवर महापालिका अवलंबून राहत आहे. त्यात ते पारंगत नसल्यामुळे डॅश बोर्डचा खेळखंडोबा झाला आहे. त्यामुळे रूग्णांच्या नातेवाइकांच्या हालअपेष्टा वाढत आहेत. डॅश बोर्डवर पाच व्हेंटिलेटर बेड, पाच ऑक्सिजन बेड उपलब्ध असल्याची माहिती काहीही बदल न होता ३- ४ दिवस तशीच ठेवली जाते. रुग्ण नोंदणी आणि डिस्चार्जनुसार डॅश बोर्ड अपडेट व्हायला हवा; परंतु तसे होत नसल्याचेही तिवारी यांनी पुराव्यांसह स्पष्ट केले. महापालिकेतील सत्ताधारी भाजपने व्यक्तिगत आणि पक्षपातळीवरील कामे सोडून पुणेकरांसाठी काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा: पुणे विद्यापीठाकडे परीक्षार्थींच्या सुमारे नऊ हजार तक्रारी

अपडेशनसाठी पालिका प्रयत्नशील

बरे झालेले रुग्ण, मृत्यू, या बाबतची नोंद ठेवून प्रत्येक हॉस्पिटलने आपल्याकडील उपलब्ध बेड, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड आदींची तपशीलवार माहिती डॅश बोर्डवर देणे अपेक्षित आहे. त्या बाबत सर्व हॉस्पिटलला सूचना केल्या आहेत. त्यांचे पालन करण्यासाठी पाठपुरावाही केला जातो. जे हॉस्पिटल प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करतात, त्यांना नोटीसा दिल्या जातात. मात्र, पुणेकरांना वेळेत बेड मिळावेत, हा डॅश बोर्डचा उद्देश साध्य करण्यासाठी आम्ही सर्व स्तरांवर प्रयत्नशील आहोत, असे महापालिकेच्या सहायक आरोग्य प्रमुख डॉ. मनीषा नाईक यांनी सांगितले. डॅश बोर्डसाठी तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे, असेही त्यांनी नमूद केले.

हेही वाचा: एमपीएससी परीक्षेत पात्र विद्यार्थ्यांच्या प्रमाणात वाढ करण्याची ‘स्टुडंट्स राईट्स’ने केली मागणी

Web Title: The Dashboard Of Bed Information Is Not Update On Pmc

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top