esakal | ऑक्सिजनअभावी चौघांच्या मृत्यूने जिल्हा आरोग्य यंत्रणा हादरली

बोलून बातमी शोधा

covid19
ऑक्सिजनअभावी चौघांच्या मृत्यूने जिल्हा आरोग्य यंत्रणा हादरली
sakal_logo
By
रमेश वत्रे

केडगाव ः येथील मोहन जनरल हॅास्पीटलमध्ये ऑक्सिजनअभावी एकाच दिवशी चार रूग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्हा यंत्रणेकडून हॅास्पीटलची तपासणी आज सुरू झाली. मात्र हॅास्पीटलकडून कागदपत्रांच्या बाबतीत सहकार्य होत नसल्याचे अधिका-यांनी सकाळशी बोलताना सांगितले. चौकशी अधिका-यांवर राजकीय पदाधिकारी दबाव आणत असल्याची चर्चा आहे. प्रशासनाने राजकीय दबावाला बळी न पडता हॅास्पीटलवर कडक कारवाई करावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.

हेही वाचा: मंचर उपजिल्हा रुग्णालयास मदतीचा 'हात'

केडगाव येथील मोहन हॅास्पीटलमध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. हॅास्पीटलचे प्रमुख डॅा. धिरेंद्र मोहन यांनी उपचारांमध्ये हलगर्जीपणा केल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे काल नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. तहसीलदार संजय पाटील यांनी केडगावात येऊन चौकशी व कारवाईचे आश्वासन दिल्याने मृतदेह ताब्यात घेण्यात आले. दरम्यान मृतांचा आकडा चारपेक्षा जास्त असल्याच्या चर्चेने जिल्हा प्रशासनाची सुत्रे वेगाने फिरली. जिल्हा वैद्यकीय पथकाने बुधवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास हॅास्पीटलला भेट दिली. तहसीलदार पाटील म्हणाले, हॅास्पीटलच्या बिलांचे लेखापरिक्षण करण्यासाठी पथक नेमले आहे. चौकशी चालू आहे. प्रांताधिकारी गायकवाड म्हणाले, जिल्हा आरोग्य अधिकारी व शल्य चिकित्सक यांचे पथक या घटनेची चौकशी करत असून ते जिल्हाधिका-यांना अहवाल सादर करणार आहे.

याबाबत वैशाली ताम्हाणे म्हणाल्या, माझ्या वडीलांची तब्बेत उत्तम असल्याचे सांगत माझ्याकडून रात्री नऊ वाजता पैसे भरून घेतले. आणि दुस-याच दिवशी वडीलांचे निधन झाले. चार रूग्णांचा मृत्यू झाला त्यादिवशी कुणीही जबाबदार डॅाक्टर रूग्णालयात नव्हते. ऑक्सिजन संपल्याची कल्पना आम्हाला देण्यात आली नाही. याची सखोल चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजे. कारवाईचे निवदेन तहसीलदारांना देण्यात आले आहे. धिरेंद्र मोहन म्हणाले, ऑक्सीजनची मागणी आम्ही वारंवार प्रशासनाकडे नोंदवली आहे. मात्र प्रशासन वेळेवर ऑक्सिजन देणार नसेल तर आम्ही हॅास्पीटल चालवायची कशी.

हेही वाचा: पुणे मुंबईकरांनाे! एसटी महामंडळाने घेतला महत्वपुर्ण निर्णय