esakal | 'प्लाझ्मा दात्यांची नोंदणी होण्यासाठी सरकारने कार्यवाही करावी'

बोलून बातमी शोधा

plasma donors
'प्लाझ्मा दात्यांची नोंदणी होण्यासाठी सरकारने कार्यवाही करावी'
sakal_logo
By
डी. के. वळसे पाटील, मंचर

मंचर : सद्यस्थितीत राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. त्यामुळे राज्यात बेड, ऑक्सिजन, रेमडीसेवीअर इंजेक्शन बरोबरच प्लाझ्माचा तुटवडा भासत आहे. अनेकांचे प्राण वाचविण्यासाठी प्लाझ्मा वरदान ठरत आहे. सरकारी व खासगी कोविड केअर सेंटरमध्ये कोरोनातून बरे झालेल्या प्लाझ्मा दात्यांची आगाऊ नोंदणी होण्यासाठी शासनाने ताबोडतोब कार्यवाही करावी, अशी मागणी मंचर (ता. आंबेगाव) येथील लोकविश्व प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन महादेव तोडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मेलद्वारे केली आहे.

हेही वाचा: कोविड रुग्णालयांचे फायर ऑडिट करणार; पुणे जिल्हा परिषदेचा निर्णय

तोडकर म्हणाले, “ज्या रुग्णाला प्लाझ्माची गरज लागते त्या रुग्णाच्या नातेवाईकांना प्लाझ्मा किंवा प्लाझ्मा डोनर शोधण्यासाठी प्रचंड धावाधाव करावी लागत आहे. मात्र अनेकवेळा डोनर शोधण्यात त्यांना अपयश येते. प्लाझ्मा अभावी रुग्ण दगावण्याची शक्यता निर्माण होते. कोरोना प्रादुर्भावामुळे गंभीर झालेल्या रुग्णाला रेमडीसेविअर इंजेक्शन दिल्यास आराम मिळतो. मात्र जर रेमडीसेविअरनेही आराम मिळाला नाही तर त्यावर प्लाझ्मा थेरपी करावी लागते. मात्र सध्याच्या वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे प्लाझ्माचाही सर्वत्र तुटवडा निर्माण झाला आहे. रेमडीसेविअर इंजेक्शन प्रमाणे आपल्याला प्लाझ्मा फॅक्टरीमध्ये किंवा फार्मासिटीकल कंपनीमध्ये तयार करता येत नाही. कोरोनावर मात केलेल्या रुग्णांच्या शरीरातूनच रक्तदानासारख्या पद्धतीने प्लाझ्मा मिळवावा लागतो. सध्याची प्लाझ्माची गरज पाहता कोरोना मुक्त झालेल्या जास्तीत जास्त रुग्णांनी प्लाझ्मादान करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. त्यासाठी समाजात सर्व थरातून जनजागृती झाली पाहिजे.

शासनाने शासकीय व खासगी कोविड सेंटर मध्ये बऱ्या झालेल्या रुग्णाला घरी सोडताना त्याच्याकडून प्लाझ्मा दाता म्हणून त्याचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, रक्तगट, कोविड पॉझिटिव्ह आल्याची तारीख व प्लाझ्मा दान करण्यास इच्छूक आहे की नाही अशी माहिती भरून घेणे गरजेचे आहे. या प्रमाणे कार्यवाही केल्यास प्लाझ्माची कमतरता भासणार नाही.-सचिन तोडकर, अध्यक्ष लोकविश्व प्रतिष्ठान, मंचर

हेही वाचा: पुणे : फी नाही, तर परीक्षा नाही! कोथरूडमधील प्रकार