esakal | लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या तत्परतेमुळे ऑक्सिजनचे संकट टळले

बोलून बातमी शोधा

oxygen crisis
लोकप्रतिनिधी अन् प्रशासनाच्या तत्परतेमुळे ऑक्सिजनचे टळले संकट
sakal_logo
By
महेंद्र शिंदे

खेड-शिवापूर : अनेक रुग्णालयात काही तास पुरेल इतकाच ऑक्सिजन शिल्लक राहिला होता. तर दुसरीकडे शिंदेवाडी (ता. भोर) येथील ऑक्सिजन प्रकल्पात सरकारी कोट्यातील एक ऑक्सिजन टँकर नुकताच उपलब्ध झाला होता. हा प्रकार समजल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे प्रशासनाशी बोलल्या आणि हा ऑक्सिजनचा टँकर सर्वांसाठी खुला झाला. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या तत्परतेमुळे गुरुवारी अनेक रुग्णालयांवर आलेले ऑक्सिजनचे संकट टळले.

हेही वाचा: बारामती लोकसभा मतदार संघातील रस्त्यांसाठी 25 कोटींचा निधी मंजूर

पुण्यासह पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठी आहे. रुग्णालयांना मागणीच्या तुलनेत ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होत नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ऑक्सिजन मिळविण्यासाठी रुग्णालयांना धावपळ करावी लागत आहे. गुरुवारी तर भोर, वेल्हा, हवेली तालुक्यासह पुणे शहरातील अनेक रुग्णालयात काही तास पुरेल इतकाच ऑक्सिजन शिल्लक राहिला होता. या ऑक्सिजन संकटामुळे अनेक रुग्णालयाचे डॉक्टर ऑक्सिजन मिळविण्यासाठी स्वतः शिंदेवाडी येथील एका ऑक्सिजन प्रकल्पात उपस्थित होते. यावेळी येथील प्रकल्पात सरकारी कोट्यातील एक द्रव ऑक्सिजन टँकर दाखल झाला होता. ही बाब डॉक्टर, स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्याबरोबर खासदार सुळे या प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्याबाबत बोलल्या आणि आणि काही वेळातच सर्व रुग्णालयांसाठी तो सरकारी कोट्यातील ऑक्सिजन उपलब्ध झाला. त्यामुळे शिंदेवाडी येथील ऑक्सिजन रिफिलिंग प्रकल्पात ऑक्सिजन नेण्यासाठी एकच झुंबड उडाली होती. या प्रकल्पाच्या बाहेर वाहनांची मोठी गर्दी झाली होती. रुग्णालय कर्मचाऱ्यांबरोबरच अनेक रुग्णालयाचे डॉक्टर येथील प्रकल्पात ऑक्सिजन नेण्यासाठी आले होते.

हेही वाचा: मंचर ग्रामपंचायत कोरोना नियंत्रण कक्षाचा रुग्णांना मानसिक आधार

"आमच्या हॉस्पिटलमध्ये काही तास पुरेल इतकाच ऑक्सिजन शिल्लक राहिला होता. त्यामुळे ऑक्सिजन मिळविण्यासाठी आम्ही स्वतः ऑक्सिजन प्रकल्पावर आलो. पुरेसा ऑक्सिजन नसल्याने नवीन रुग्ण घेणे बंद केले होते. आता मात्र पुढील बारा तास पुरेल इतका ऑक्सिजन उपलब्ध झालेला आहे," अशी प्रतिक्रिया डॉ. अमेय कर्णिक आणि डॉ. संभाजी कारंडे यांनी व्यक्त केली.

क्रायोजेनिक गॅस इंडस्ट्रीजचे प्रकाश गायकवाड म्हणाले, "द्रव ऑक्सिजन दूरवरून येत असल्याने वेळ लागतो त्यामुळे अडचण निर्माण होते. आज अशावेळी सरकारी कोट्यातील ऑक्सिजन टँकर नुकताच दाखल झाला होता. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी हा ऑक्सिजन टँकर वापरण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे आज रुग्णालयांना ऑक्सिजन देणे शक्य झाले."

शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे म्हणाले, "अनेक रुग्णालयात मोजकाच ऑक्सिजन शिल्लक राहिला होता. तर येथील प्रकल्पात ऑक्सिजनचा सरकारी कोटा शिल्लक होता. याविषयी खासदार सुप्रिया सुळे या प्रशासनाशी बोलल्या. त्यानंतर हा ऑक्सिजनचा सरकारी कोटा सर्वांसाठी उपलब्ध करण्यात आला. त्यामुळेच आजचे हे ऑक्सिजन संकट टळले आहे."

हेही वाचा: पुणे विद्यापीठाच्या आरोग्य क्षेत्रातील कक्षा रुंदवणार; आरोग्य विज्ञान विद्यापीठसोबत सामंजस्य करार