१५ जानेवारीपासून वाजणार राज्य नाट्य स्पर्धेचे बिगुल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

State Drama Competition
१५ जानेवारीपासून वाजणार राज्य नाट्य स्पर्धेचे बिगुल

१५ जानेवारीपासून वाजणार राज्य नाट्य स्पर्धेचे बिगुल

- महिमा ठोंबरे

पुणे : कोरोनामुळे गेली दोन वर्षे ब्रेक लागलेल्या राज्य नाट्य स्पर्धेचा मुहूर्त अखेर लागला आहे. हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेचे वेळापत्रक (State Drama Competition)जाहीर झाले असून १५ जानेवारीपासून राज्यभरात या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला प्रारंभ होईल. पुणे केंद्रावर यंदा १५ संघांचे सादरीकरण होणार असून स्पर्धेची प्राथमिक फेरी सावित्रीबाई फुले नाट्यगृहात रंगणार आहे. वाढत्या कोरोना(corona) रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित वातावरणात स्पर्धा पार पाडण्याचे आव्हान सरकारपुढे आहे.

हेही वाचा: पुणेकर संस्थेच्या पुढाकाराने काश्‍मीरमधील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रात अभ्यास दौरा

उदयोन्मुख कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, यासाठी राज्य सरकारतर्फे प्रायोगिक अर्थात हौशी नाटकांसाठी राज्य नाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. २०१९ मध्ये ५९ वी राज्य नाट्य स्पर्धा पार पडली होती. मात्र पुढील दोन वर्षे कोरोनामुळे स्पर्धेचे आयोजन लांबणीवर टाकण्यात आले. यंदा या स्पर्धेचा मुहूर्त लागला असून स्पर्धेचे ६० वे अर्थात हीरक महोत्सवी वर्ष असल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. १५ जानेवारीपासून राज्यातील एकूण १९ केंद्रांवर मराठी राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी रंगणार असून त्यानंतर अंतिम फेरी रंगेल. तर फेब्रुवारी महिन्यात टप्प्याटप्‍याने हिंदी राज्य नाट्य, संस्कृत राज्य नाट्य, बाल राज्य नाट्य, दिव्यांग बाल राज्य नाट्य व संगीत राज्य नाट्य स्पर्धा पार पडणार आहेत.

हेही वाचा: पुणे : न्यायालयाचे कामकाज एक तासाने केली कमी

पुण्यातील स्पर्धेला ‘अवकाश कलामंच’ संस्थेच्या ‘अनागत’ या नाटकाने प्रारंभ होणार आहे. गंज पेठेतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले नाट्यगृहात दररोज सायंकाळी ७ वाजता एका नाटकाचे सादरीकरण होईल. २९ जानेवारीला ‘योगेश पार्क सहकारी गृहरचना संस्थे’च्या ‘बावळेवाडी’ या नाटकाने प्राथमिक फेरीची सांगता होईल. यावेळी १५ संघांनी प्रवेश घेतल्याने पुणे केंद्रातून दोन नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड केली जाईल. दरम्यान, शहरात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितपणे स्पर्धा पार पाडण्याचे आव्हान आहे. मात्र सरकारने यासंदर्भात आखलेल्या नियमावलीचे स्पर्धेदरम्यान काटेकोर पालन करण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.(Pune News)

हेही वाचा: पुणे जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका शिफ्टमध्ये

पुणे केंद्रावरील स्पर्धेचे नियोजन

सहभागी संघ - १५

तारिख - १५ ते २९ जानेवारी

वेळ - सायंकाळी ७ वाजेपासून

स्थळ - ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले नाट्यगृह, गंज पेठ

कोरोना पार्श्वभूमीवरील नियम

- नाट्यगृहात आसन क्षमतेच्या ५० टक्के प्रेक्षकांनाच प्रवेश

- मास्क वापरणे बंधनकारक

- लसीचे दोन्ही डोस पूर्ण असणे आवश्यक

- कलाकारांचेही लसीकरण पूर्ण असणे गरजेचे

- शारीरिक अंतराचे पालन

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune Newsdrama
loading image
go to top