esakal | विवाहित प्रेयसीनेच केला घात; २६ दिवसांनंतर खूनाचा छडा

बोलून बातमी शोधा

crime

विवाहित प्रेयसीनेच केला घात; २६ दिवसांनंतर खूनाचा छडा

sakal_logo
By
राजेंद्र सांडभोर

राजगुरूनगर : राजगुरूनगर येथे राहणाऱ्या प्रियकराने लग्न केले म्हणून, आव्हाट (ता. खेड) येथील विवाहित प्रेयसीने, तिच्या पतीच्या आणि दिराच्या मदतीने प्रियकराचा काटा काढल्याची घटना ३ एप्रिल रोजी घडली आणि २७ एप्रिल रोजी उघडकीस आली. महेश वसंत लोहकरे ( वय २६ वर्षे, रा. समतानगर, राजगुरुनगर) असे मृताचे नाव आहे.

हेही वाचा: मंचर उपजिल्हा रुग्णालयास मदतीचा 'हात'

खेडचे पोलिस निरीक्षक सतीश गुरव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महेश आंबेगाव तालुक्यातील पोखरकरवाडी येथील होता. तो कामानिमित्त येथील समतानगर परिसरात राहत होता. महेश ३ एप्रिलपासून गायब असल्याची तक्रार त्याच्या आईने ६ एप्रिल रोजी खेड पोलिस ठाण्यात दिली होती. त्या तपासादरम्यान महेशचे आव्हाट (ता. खेड) येथील पुष्पा भरत ढोंगे या महिलेशी अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पुढील तपासात पुष्पा गेल्या चार वर्षांपासून पती व मुलांना सोडून महेश याच्यासोबत राहत होती, असे आढळून आले. दरम्यान महेशने दुसरे लग्न केले. त्याने दुसरे लग्न केल्याचा राग मनात धरुन पुष्पा हिने ३ एप्रिल रोजी महेशला राहत्या खोलीत डांबून ठेवले आणि पती भरतला बोलावून घेतले. त्या दोघांनी महेशचा काटा काढायचा ठरवले. यासाठी भरतने आपला भाऊ भगवान व मित्र दिनेश तारु या दोघांनाही कटात सामील करुन घेतले. चौघांनी मिळून पुष्पा हिच्या खोलीत महेशला लोखंडी राॅडने मारहाण केली. त्यानंतर महेशला मोटारसायकलवर बसवून जबरदस्तीने कारकुडी (ता. खेड) येथील जंगलात घेऊन गेले. तेथे षुष्पाच्या ओढणीने त्याच्या गळ्याला बांधून झाडाला लटकावून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह मोटरसायकलवरून गोहे खुर्द गावाच्या शिवारात जाळण्याचा प्रयत्न केला व नंतर अर्धवट जळालेल्या अवस्थेत खड्डा करुन गाडला.

हेही वाचा: राजगुरूनगर : जमिनीच्या पैशावरुन तरूणाचा निर्घृण खून 

सदर गुन्ह्याच्या तपासात संशयित भरत ढोंगे याला अटक केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी पुष्पा, तिचा नवरा भरत, दीर भगवान आणि नवर्‍याचा मित्र दिनेश तारु यास चौघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. संशयित आरोपीने दाखवलेल्या जागेवर पंचनामा करुन, पोलिसांनी मृतदेह खोदून काढला. खूप दिवस झाल्याने फक्त सापळा मिळून आला. न्यायालयाने आरोपींना ४ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा: पुणे : रिंगरोडच्या कामाला मिळणार गती