राज्यातील दूध खरेदी दराबाबत काय़ होणार निर्णय; वाचा सविस्तर

milik.jpg
milik.jpg

पुणे : राज्यात दूध पावडर आणि लोण्याचे अतिरिक्त उत्पादन झाले आहे. त्यातच लॉकडाऊनमुळे मागणीत मोठी घट झाल्याने दूध पावडर आणि लोण्याचे प्रतिकिलोचे दर पुर्वीच्या तुलनेत निम्म्यावर आले आहेत. यामुळे दूध संस्थांमार्फत शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या जाणाऱ्या दूध खरेदी दरावर कपातीची टांगती तलवार असणार आहे.

त्यातच केंद्र सरकारने दहा हजार टन दूध पावडर परदेशातून आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय दूध उत्पादक शेतकरी, सहकारी दूध उत्पादक संघ आणि खासगी दूध संस्थांना आर्थिकदृष्ट्या संकटात आणणारा आहे. 

आजघडीला राज्यात ५० हजार टन पावडर आणि २० हजार लोणीसाठा उपलब्ध आहे. याउलट या दोन्हींना मागणीच नाही. यामुळे हा सर्व साठा अतिरिक्त झाला आहे. त्यातच केंद्र सरकारने दूध भुकटी आयातीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे स्थानिक बाजारात पावडर व लोण्याची मागणी संपेल. पर्यायाने या दोन्हींच्या दरात आणखी घट होण्याचा धोका निर्माण झाला आहे, असे मत पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (कात्रज डेअरी) अध्यक्ष विष्णू हिंगे यांनी व्यक्त केले आहे.

लॉकडाऊनमुळे राज्यात मागणीअभावी मोठ्या प्रमाणात दूध अतिरिक्त झाले होते. त्यामुळे खासगी दूध संघांनी दुधाच्या खरेदी दरात मोठी कपात केली होती. परिणामी दूध उत्पादक शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले होते. त्यामुळे राज्यातील सहकारी दूध संघांचे रोज दहा  लाख लिटर अतिरिक्त दूध खरेदी करण्याचा आणि त्यापासून दूध पावडर तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. यानुसार मागील तीन महिन्यांपासून पावडरचे उत्पादन वाढले आहे. 

सध्या पावडरचे दर प्रतिकिलो १५५ रूपये तर लोण्याचे दर प्रतिकिलो १९० वर आले आहेत. पुर्वी हेच दर अनुक्रमे ३३० व ३४० रुपये इतके होते. मुळात आधीच दर पडलेले. त्यातच आयात होणार म्हटलं की, अजून दर कमी होणार, या आशेने व्यापारी स्थानिक बाजारातील खरेदी थांबवत असतात. यामुळे आणखी भाव कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. परिणामी सहकारी व खासगी दूध संघ आर्थिकदृष्ट्या अडचणीत येणार आहेत. याचा थेट परिणाम हा दूध खरेदी दरावर होईल, असे मत महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे सचिव प्रकाश कुतवळ यांनी व्यक्त केले आहे. पावडर आयातीचा हा निर्णय रद्द करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

देशात दोन वर्ष पुरेल इतका साठा-देशात सध्या दोन लाख टन इतका दूध पावडरचा साठा आहे. हा साठा दोन वर्ष पुरेल इतका असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. याचाच अर्थ दरवर्षी देशाला फक्त १ लाख टन पावडरचीच गरज आहे.  त्यामुळे भारताकडे सध्या आधीच दोन वर्षं पुरेल इतका साठा आहे.  मग पुन्हा आयात कशासाठी, असा सवाल राज्यातील सहकारी व खासगी दूध संघांनी उपस्थित केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com