बारामतीकरांनो, लॉकडाउनमध्ये हे असणार सुरू, ही असतील बंधने

मिलिंद संगई
Tuesday, 14 July 2020

बारामती शहरात गुरुवारपासून (ता. 16) चार दिवस कडक लॉकडाउन करण्यात येणार असून, सात दिवस हा लॉकडाउन असेल

बारामती (पुणे) : बारामती शहरात गुरुवारपासून (ता. 16) चार दिवस कडक लॉकडाउन करण्यात येणार असून, सात दिवस हा लॉकडाउन असेल, असे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी आज स्पष्ट केले. या संदर्भात जारी केलेल्या आदेशामध्ये दूध, औषधे व वैद्यकीय सेवा वगळता 20 जुलैपर्यंत सर्व व्यवहारांवर प्रतिबंध घालण्यात आले आहेत. दुस-या टप्प्यात म्हणजे 20 जुलैनंतर काही प्रमाणात शिथीलता दिली जाणार आहे. बारामतीचा लॉकडाउन 23 जुलैपर्यंत म्हणजे सात दिवस कायम असेल. 

अमोल कोल्हे यांच्या पंचसूत्रीचे पालन करा...कोरोनाला दूर रोखा....

बारामती शहरातील सर्व किराणा दुकाने, किरकोळ व ठोक विक्रेते व सर्व इतर व्यवसाय 16 ते 19 जुलैपर्यंत बंद असतील. त्यानंतर 20 ते 23 जुलै दरम्यान अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा करणारी दुकाने व ठोक विक्रेते यांची दुकाने सकाळी 9 ते दुपारी एक वाजेपर्यंत सुरु असतील. इतर सर्व आस्थापना व दुकाने 23 जुलैपर्यंत बंद असतील. बगीचे, क्रीडांगण व मोकळ्या जागा, व्यायामशाळा, जिम, जलतरण तलाव, चित्रपटगृह बंद असतील. तसेच, सार्वजनिक ठिकाणी मॉर्निंग व इव्हिनिंग वॉकवरही 23 जुलैपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. वर्तमानपत्रांचे वितरण या काळात सकाळी सहा ते नऊ या वेळेत करण्यास परवानगी देण्यात आली आहे. नगरपालिका हद्दीलगत एमआयडीसी परिसरातील अत्यावश्यक सेवेतील मेडीकल व दवाखाने वगळून इतर सर्व दुकाने, शॉपिंग मॉल व गर्दी होणारी ठिकाणे 16 ते 19 जुलैपर्यंत बंद असतील, तर 20 ते 23 जुलैदरम्यान सकाळी नऊ ते दुपारी एकपर्यंत सुरु असतील.  ज्या बांधकामांच्या जागेवर कामगारांची निवास व्यवस्था आहे त्यांना काम सुरु ठेवता येणार आहे.

दौंडमधील या कुटुंबातील सहा जणांचे कोरोनाचे रिपोर्ट...
 
मटण, चिकन, अंडी, मासे विक्री 16 ते 19 जुलैपर्यंत पूर्णपणे बंद, तर 20 ते 23 जुलै दरम्यान सकाळी नऊ ते दुपारी एकपर्यंत सुरू असतील. सर्व किरकोळ व ठोक विक्रीची ठिकाणे आडत, भाजी मार्केट, फळविक्रेते, आठवडी व दैनिक बाजार , फेरीवाले व कृषी उत्पन्न बाजार समिती 16 ते 19 जुलैपर्यंत पूर्णपणे बंद, तर 20 ते 23 जुलैदरम्यान सकाळी नऊ ते दुपारी एकपर्यंत सुरु असतील. सर्व केश कर्तनालय, सलून, ब्युटी पार्लर, स्पा यांच्यासह हॉटेल, रेस्टॉरंट, लॉज, बार, मार्केट, मॉल हे 23 जुलैपर्यंत पूर्णतः बंद असतील. 

जुन्नरमधील कोरोनाबाधितांसाठी एक हजार बेडची व्यवस्था

या घटकांना असेल परवानगी
न्यायालयाचे कर्मचारी, अधिकारी, न्यायाधीश, वकील, शासकीय कर्मचारी, डॉक्टर, नर्स, अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर, वर्तमानपत्र, प्रिंट, डिजिटल मिडीयाचे कर्मचारी, फार्मा, संबंधित मेडीकल दुकानाचे कर्मचारी, दूध विक्रेते, अत्यावश्यक सेवा ज्यात कृषी, बी बीयाणे, खते, गॅस वितरक, पाणीपुरवठा, आरोग्य व स्वच्छता करणारे कर्मचारी, अग्निशामन व जलःनिस्सारण तसेच पूर्वपावसाळी व पावसाळी कामे करणारे महावितरण कंपनीचे कर्मचारी, पोलिस, महसूल, नगरपालिका कर्मचारी यांना स्ववापरासाठी चार व दुचाकी वाहन वापरण्यास परवानगी असेल. ओळखपत्र व इतरांनी आधारकार्ड व वाहनाची कागदपत्रे ठेवावीत. औषध, अन्न उत्पाद, सलग प्रक्रीया व निर्यात उद्योग व त्यांच्या पुरवठा नियमानुसार सुरु राहतील व एमआयडीसी पोर्टलवरून पूर्वी दिलेली परवानगी ग्राह्य धरण्यात येईल. नगरपालिका कार्यक्षेत्रातील परवाना असलेल्या उद्योगांना, औद्योगिक सहकारी वसाहत व एमआयडीसी व खासगी जागेवरील उद्योग क्षेत्रात जाण्यासाठी व परतण्यासाठी दुचाकी व चार चाकी वाहन किंवा निश्चित बसमधून मंजूर संख्येइतक्या प्रवाशांना प्रवासासाठी परवानगी असेल. नगरपालिका क्षेत्रात शेतीमालाची वाहतूक करण्यास परवानगी असेल तसेच शेतीची कामे, शेतमाल दुकाने, आस्थापना, कृषी बी बीयाणे, खते, किटकनाशके, चारा दुकाने प्रक्रीया उद्योग सुरु राहतील.  
  
Edited by : Nilesh Shende


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: These rules are in lockdown in Baramati city