कॅनरा बॅंकेची दोन एटीएम चोरट्यांनी फोडली; पळवली आठ लाखांची रोकड

सकाळ वृत्तसेवा
Friday, 16 October 2020

तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 26 ते 29 सप्टेंबर या कालावधीत घडली.

पुणे : कॅनरा बॅंकेच्या एटीएम मशीनचा वरच्या भागातील डिस्प्ले हुड काढून, मशीनची इंटरनेट सेवा बंद केली. आणि चोरट्यांनी तब्बल आठ लाख 12 हजार रुपयांची रोकड काढून घेत 'धूम' ठोकली. ही घटना कॅनरा बॅंकेच्या सदाशिव पेठ आणि धनकवडी येथील एटीएम केंद्रांवर घडली. याप्रकरणी सहकारनगर आणि दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Rain Updates: अतिवृष्टीचा पुणे विभागाला तडाखा; २८ जणांनी गमावला जीव, हजारोंचं स्थलांतर​

ऋषीराज भोसले (वय 34, रा.हडपसर) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यावरुन तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 26 ते 29 सप्टेंबर या कालावधीत घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कॅनरा बॅंकेच्या धनकवडी शाखेचे व्यवस्थापक आहेत. कॅनरा बॅंकेचे सातारा रस्त्यावर धनकवडी येथे एटीएम केंद्र आहे.

संबंधित एटीएम केंद्रामध्ये 26 ते 29 सप्टेंबर या कालावधीमध्ये तीन अनोळखी व्यक्ती शिरले होते. त्यांनी एटीएम मशीनमधून क्रेडीट कार्डच्या सहाय्याने पैसे काढण्याची प्रक्रिया केली. त्यामधून काही पैसे काढल्यानंतर त्यांनी एटीएम मशीनचा वरच्या भागातील डिस्प्ले हुड काढून मशीनची इंटरनेट सेवा बंद चालू केली. किंवा रिसेटचे बटन दाबून मशीन बंद चालू केले. त्यानंतर त्यांनी काढलेली रकमेचा व्यवहार बॅंकेच्या रेकॉर्डवर येऊ न देण्यासाठी मशीनची छेडछेड करून पाच लाख 66 हजार रुपये काढून घेत बॅंकेची फसवणूक केली. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार बिडवई करीत आहेत.

Bihar Election: रविशकुमार यांच्या भावाला काँग्रेसची उमेदवारी​

दरम्यान, याच पद्धतीने सदाशिव पेठेमध्येही चोरट्यांनी पैशांची चोरी केली. याप्रकरणी आशुतोष उपाध्याय (वय 33, रा. वल्लभनगर, पिंपरी) यांनी दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 11 आणि 12 ऑक्‍टोबरला घडली आहे. फिर्यादी हे कॅनरा बॅंकेचे अधिकारी आहेत. बॅंकेच्या सदाशिव पेठेतील विजयानगर येथील एटीएम केंद्रामध्ये 11 आणि 12 ऑक्‍टोबर रोजी सकाळी पावणे सात ते नऊ या वेळेत दोघेजण आले.

त्यांनी एटीएमचे अप्पर डिस्प्ले हुडचे कुलूप चावीने उघडून डेबीट कार्डचा वापर करुन पैसे काढण्याची प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर मशीनचे इंटरनेट बंद करुन किंवा रिसेटचे बटनाचा वापर करुन मशीन बंद केली. त्यानंतर मशीनमधील दोन लाख 46 हजार रुपये काढून घेत बॅंकेची फसवणूक केली. या प्रकरणाचा तपास प्रभारी पोलिस निरीक्षक (गुन्हे) गणेश माने करीत आहेत. दोन्ही घटनांमध्ये आठ लाख 12 हजार रुपयांची रक्कम चोरट्यांनी चोरुन नेली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thieves stole Rs 8 lakh from Canara Bank ATM in Pune city