दौंड : विक्री अधिकाऱ्यास लुटणाऱ्या तिघांना अटक

दौंड : विक्री अधिकाऱ्यास लुटणाऱ्या तिघांना अटक

दौंड : कुरकुंभ - दौंड रस्त्यावर लिफ्ट देण्याच्या बहाण्याने एका खासगी कंपनीतील विक्री अधिकार्यास लुटल्याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या चार दिवसांत हा गुन्हा उघडकीस आणत संशयित आरोपींकडून २ लाख २६ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

५ डिसेंबर रोजी पुना दाळ अॅण्ड बेसन मिल मध्ये विक्री अधिकारी म्हणून कार्यरत संजय मिश्रीलाल मुनोत (वय ५४, रा. दौंड) कुरकुंभ येथून दौंड कडे येण्याकरिता कुरकुंभ चौकात थांबले असता एका अनोळखी दुचाकीस्वाराने त्यांना लिफ्ट देऊ केली. दुचाकी दौंडच्या दिशेने न नेता एसआरपीफच्या गोळीबार मैदानाजवळील कॅनॅाल परिसरात नेली असता तेथे दोघांनी संजय मुनोत यांना भोसकून मारण्याची धमकी दिल्यानंतर संजय मुनोत यांनी त्यांच्याकडील दहा हजार रूपये रोख, सोन्याची साखळी, अंगठ्या, मोबाईल संच, एटीएम कार्ड, असा एकूण १ लाख ९४ हजार रूपयांचा ऐवज काढून दिला होता.

दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस ओमकार गावडे हा तरूण सोन्याच्या अंगठ्या व मोबाइल संच विकण्यासाठी कुरकुंभ येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार ९ डिसेंबर रोजी पथकाने पाळत ठेवून ओमकार उर्फ काका महेंद्र गावडे (वय २१, रा. होलेमळा, बेटवाडी, ता. दौंड), राजेश संभाजी बिबे (वय १९, मूळ रा. माळेवाडी, बीड, सध्या रा. गिरीम ता. दौंड) व अजय ज्ञानेश्वर पवार (वय १९, मूळ रा. गिरीम ता. दौंड, सध्या एचपी गेटसमोर, लोणी काळभोर) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून एक पल्सर मोटरसायकल, २ सोन्याच्या अंगठ्या, ८ मोबाईल संच व रोख रक्कम असा एकूण २ लाख २६ हजार २७० चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

गुन्ह्यातील मोबाईल संच विकत घेणारा विशाल दिलीप आटोळे (वय २४, रा. गोकुळनगर, गोपाळवाडी, ता. दौंड) याला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. लूटमार करणार्या तिघा संशयितांचा कुरकुंभ येथे मागील महिन्यात एक टेम्पोचालकास कोयत्याचा धाक दाखवून लूटमार प्रकरणात सहभाग उघड झाला आहे.

पुणे ग्रामीणचे अधीक्षक अभिनव देशमुख, अपर अधीक्षक मिलींद मोहिते, उप अधीक्षक राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक पद्माकर घनवट व त्यांच्या पथकातील सहायक निरीक्षक पृथ्वीराज ताटे, हवालदार महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, पोलिस नाईक गुरू गायकवाड, सुभाष राऊत, कॅान्स्टेबल दगडू वीरकर यांनी या कारवाईत भाग घेतला.

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com