इंदापुरात शिक्षकाचा, तर शिरूरमध्ये दोघांचा कोरोनाने मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 4 August 2020

शिरूर तालुक्यातील धानोरे येथील एका ज्येष्ठ नागरिकाचा व सणसवाडी येथील एका ज्येष्ठ महिलेचा़, तर इंदापूर तालुक्यातील सणसर येथील माध्यमिक शिक्षकाचा आज कोरोनाने मृत्यू झाला.

पुणे  : शिरूर तालुक्यातील धानोरे येथील एका ज्येष्ठ नागरिकाचा व सणसवाडी येथील एका ज्येष्ठ महिलेचा़, तर इंदापूर तालुक्यातील सणसर येथील माध्यमिक शिक्षकाचा आज कोरोनाने मृत्यू झाला.

वालचंदनगर : इंदापूर तालुक्यातील सणसर येथील माध्यमिक शिक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

शरद पवार पुन्हा ठरले चाणक्य

सणसरमधील माध्यमिक शिक्षकास गेल्या आठ दिवसापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. तसेच, त्याच्या संपर्कातील कुटुंबातील ८ नागरिकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांची प्रकृती चांगली आहे. कोरोनाग्रस्त माध्यमिक शिक्षकावर बारामतीमधील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. आज (ता. ४) सकाळी त्यांना हद्य विकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागामध्ये सूत्रसंचालक म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे. शिक्षकाच्या मृत्यूमुळे इंदापूर तालुक्यातील कोरोनागस्त रुग्णाच्या मृत्यूचा आकडा सातवर गेला आहे. आतापर्यंत तालुक्यामध्ये २१७ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले असून, ७० रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा पोळ यांनी दिली.

राष्ट्रवादीच्या आमदाराकडून सरकारला घरचा आहेर... 

तळेगाव ढमढेरे : शिरूर तालुक्यातील धानोरे येथील एका ज्येष्ठ नागरिकाचा व सणसवाडी येथील एका ज्येष्ठ महिलेचा आज कोरोनाने मृत्यू झाला असल्याची माहिती तळेगाव ढमढेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा घोरपडे यांनी दिली.  

धानोरे या छोट्या गावात कोरोनाला रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाला यश आले होते, परंतु येथील एका सामाजिक कार्यकर्त्याला गेल्या महिन्यात कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींची कोरोना चाचणी केली असता त्यांचे वडीलही कोरोना पॉझिटिव्ह निघाले होते. त्यांच्यावर वाघोली येथे उपचार चालू होते. परंतु, आज त्यांची प्राणज्योत मालवली. ज्येष्ठ नागरिकाच्या मृत्यूमुळे धानोरे ग्रामस्थांसह शिरूर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. नागरिकांनी कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी शासनाचे नियम पाळावेत, तोंडाला मास्क लावावा, सॅनिटायझरचा वापर करावा, गर्दी टाळावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three die in Pune district due to corona disease