
पिरंगुट (पुणे) : मुळशी तालुक्यातील घोटावडे फाटा येथे उरवडे रस्त्यावर टेंपो पलटी होऊन गणेशमूर्ती विक्रीच्या स्टॅालमध्ये घुसला. या अपघातात गणेशमूर्ती विक्रेता मंगेश कल्याण रणदिवे (वय २३) याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले असून, गणेशमूर्ती खरेदीसाठी आलेल्या दोन ग्राहक महिला जखमी झाल्या आहेत. तसेच, विक्रीसाठी ठेवलेल्या दीडशे गणेशमूर्ती, पत्र्याचे शेड, स्टॅाललगतचे उसाच्या गुऱ्हाळाचे शेड, दोन दुचाक्या व अन्य दुकानांचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे.
याबाबत जखमी मंगेश याचा भाऊ अशोक कल्याण रणदिवे यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी चारच्या सुमारास एक रिकामा टेंपो (क्र. एमएच ०४ एफयु ७३१९) उरवडे बाजूने घोटावडे फाटा येथून पौड बाजूला जात होता. येथील उरवडे बाजूने घोटावडे फाट्यावर येताना तीव्र उतार आहे. याशिवाय पौड बाजूला वळताना इंग्रजी एल आकाराचे वळण आहे. त्यामुळे वाहनांचा वेगही या ठिकाणी जास्त असतो. त्यामुळे येथील चौकातून पोड बाजूला वळताना चालकाचे अचानक टेंपोवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे हा टेंपो येथील गणेशमूर्ती विक्री स्टॅालमध्ये घुसला. त्यात विक्रेता रणदिवे जखमी झाला. त्याचवेळी मूर्ती खरेदी करण्यासाठी स्टॅालसमोर उभ्या असलेल्या दोन महिलांनाही टेंपोने धडक दिल्याने त्या दोन महिलाही जखमी झाल्या आहेत. गुजर व गायसमुद्रे अशी किरकोळ जखमी झालेल्या या महिलांची नावे असून, पूर्ण नावे समजू शकली नाहीत. सर्व जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेले आहे. अपघातानंतर टेंपोचालक फरार झाला आहे.
घोटावडे फाटा हा कायम गजबजलेला भाग असतो. आजही या भागात खरेदीसाठी ग्राहक व अन्य नागरिकांनी गर्दी केलेली होती. कायमच वर्दळीच्या या भागात हा अपघात झाला. त्यावेळी सुदैवाने अन्य वाहने आणि माणसे कमी प्रमाणात होती. अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. तरीही अपघातानंतर विक्रीसाठी ठेवलेल्या दीडशे गणेशमूर्ती, पत्र्याचे शेड, स्टॅाललगतचे उसाच्या गुऱ्हाळाचे शेड, मांडण्या, टेबल आणि अन्य वस्तूंचे मोठे नुकसान झाले असून, अन्य दुकानांचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच, मंगेश याची दुचाकी व गणेशमूर्ती खरेदी करण्यासाठी आलेल्या महिलांची दुचाकी, अशा दोन्ही दुचाकींचाही चक्काचूर झाला आहे.
जखमी मंगेश हा कासार आंबोली येथे कुटुंबासह राहत असून, त्यांचा फळविक्रीचा व्यवसाय आहे. रणदिवे कुटुंबाचे मूळ गाव चिंचपोर ढगे (ता. भूम, जि. उस्मानाबाद), असे असून, मंगेश हा तरुण फळविक्रीचाही व्यवसाय करीत असतो. मात्र, सध्या गणेशोत्सवानिमित्त त्याने गणेशमूर्ती विक्रीचा स्टॅाल उभारला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.