दलालांची दुकाने बंद झाल्याने तीळपापड; माजी मंत्री सदाभाऊ खोत यांची विरोधकांवर टीका

जनार्दन दांडगे
Friday, 25 September 2020

शेतकऱ्यांच्या जिवावर अनेक वर्षे फुकट खाणाऱ्या लोकांची दुकाने बंद पडणार असल्याने विरोधकांचा तीळपापड झाल्याची टीका रयत क्रांती संघटनेचे नेते व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी सोरतापवाडी (ता. हवेली) येथे केली. 

उरुळी कांचन (पुणे) : नरेंद्र मोदी सरकारने कृषी विधेयक अंमलात आणून शेतकऱ्यांना दलालांपासून मुक्ती मिळवून दिली आहे. या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना देशातील कोणत्याही भागात माल विक्री करता येणार आहे. शेतमालाला संरक्षण, कायदेशीर आधार व आधारभूत किंमत मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या जिवावर अनेक वर्षे फुकट खाणाऱ्या लोकांची दुकाने बंद पडणार असल्याने विरोधकांचा तीळपापड झाल्याची टीका रयत क्रांती संघटनेचे नेते व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी सोरतापवाडी (ता. हवेली) येथे केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खोत म्हणाले, ""देशात ब्रिटिश काळापासूनचे कायदे अजून अस्तित्वात आहेत. हे कायदे शेतकऱ्यांना लुटणारे आहे. अत्यावश्‍यक वस्तूंच्या जाचक कायद्यात शेतमालाचा समावेश असल्यानेच, शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळत नाही. शेतमालाचा बाजारभाव ठरविण्याचा अधिकार शेतकऱ्यांऐवजी दलालांच्या हाती असल्याने, आजपर्यंत शेतकरी नागवला गेला. दलाल मंडळी शेतकऱ्यांच्या हातावर रुमाल ठेवून, दिवसाढवळ्या फसवणूक करीत होती. केंद्र सरकारच्या सुधारित कायद्याने देशात एकच बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. या कायद्याने कडधान्ये, कांदा, डाळी, तेल हे अत्यावश्‍यक वस्तूंच्या यादीतून वगळल्याने शेतकऱ्यांना हाताला चांगला दाम मिळणार आहे.'' 

Video : अजित पवार यांनी पुण्यातील मेट्रोचे काम वेळेत पूर्ण करण्याच्या दिल्या सूचना

यावेळी माजी मंत्री बाळा भेगडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, उपाध्यक्ष गणेश कुटे, प्रविण काळभोर, हवेली तालुकाध्यक्ष सुनिल कांचन, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, हवेली पंचायत समितीचे सदस्य श्‍याम गावडे, अजिंक्‍य कांचन, पूनम चौधरी, भानुदास शिंदे, एम. एस. चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सोरतापवाडीचे माजी सरपंच व भाजपचे जिल्हा सरचिटणीस सुदर्शन चौधरी यांनी केले.

काळजी घ्या, तुम्ही कोरोनावर मात करून लवकरच बरे व्हाल ! 

गुढ्या उभारून निर्णयाचे स्वागत 
संसदेच्या अधिवेशनात तीन कृषी विधेयकांना मंजुरी देऊन, कायद्यात रुपांतर करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी रयत क्रांती संघटना व शेतकरी संघटना यांच्या वतीने सोरतापवाडी (ता. हवेली) येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. रयत क्रांती संघटनेने पंतप्रधान मोदी यांच्या प्रतिमेची बैलगाडीतून मिरवणूक काढून व शेतात गुढ्या उभारून निर्णयाचे स्वागत केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tilapapad due to closure of broker shops; Former Minister Sadabhau Khot criticizes the opposition