बारावीच्या विद्यार्थ्यांनो, अभ्यासक्रम बदललाय, तरीही 'या' चतुःसूत्रीच्या आधारे मिळवा हमखास यश!

HSC_Students
HSC_Students

बारावीचा अभ्यासक्रम बदलला आहे. त्यामुळे परीक्षेला सामोरे कसे जायचे, याचे नियोजन आताच करायला हवे. अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी चतुःसूत्रीचा अवलंब केला, तर हमखास यश मिळेल. काय आहे ही चतु:सूत्री जाणून घ्या या लेखातून...

बारावीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करायचे आहे. बाहेरच्या जगात काहीही उलथापालथ झाली, तरी आपण घरात बसून ऑनलाईन तास व स्वअध्ययन यावर भर द्यायचा आहे. सध्या कुठल्याही प्रकारच्या खासगी शिकवणी नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा जायचा-यायचा बहुमूल्य वेळ वाचणार आहे, त्याचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे यासाठी खालील चतु:सुत्री कामाला येणार आहे.

वेळेचे नियोजन, स्वयंशिस्त, स्वअध्ययन, केंद्रित दृष्टीकोन ही ती चतु:सूत्री आहे.असा जर दृष्टीकोन विद्यार्थ्यांनी ठेवला तर यश अजिबात दूर नाही. 

- वेळेचे नियोजन : हा पहिला मुद्दा पहिला तर सकाळी किती वाजता उठायचे, ती वेळ विद्यार्थ्यांनी आधीच ठरवावी. टीव्ही बघू नका किंवा मोबाईल वापरू नका असे मी अजिबात म्हणणार नाही, पण त्यासाठी एक वेळ निश्चित करून घ्यावी. किती वेळ टीव्ही पहायचा, कितीवेळ मोबाईल वापरायचा याचे सुव्यवस्थित नियोजन आपल्या कडे पाहिजे. एक तास त्यासाठी राखून ठेवण्यास हरकत नाही. तसेच सध्या एक तास आपल्या आई वडिलांना कामात मदत करायला पण पाहिजे. ती वेळ ताण तणावाचे नियोजन म्हणून वापरू शकता. स्वयंपाक घरात एखादा नवीन पदार्थ करून जर नवनिर्मितीचा आनंद मिळत असेलतर जरूर करून पहा.

तसेच  रोज एक तास घरच्या घरी  सूर्यनमस्कार, योगसने करणे गरजेचे आहे. प्राणायाम केल्यानी मनावरचे ताणतणाव दूर होतील. मन आनंदी, आशावादी  व ताजे रहाण्यास या गोष्टीचा खूप उपयोग होतो. तीन तास अशाप्रकारे घालवल्यावर उरलेला दिवसभराचा सर्व वेळ विद्यार्थ्यांनी अभ्यासात घालवणे आवश्यक आहे. अभ्यासामध्ये दर एक ते दिड तासानी दहा मिनिटे ब्रेक घेण्यास हरकत नाही, त्यावेळी पक्षी, झाडे, आभाळ याकडे पाहिल्यास खूप बरे वाटते व नव्या जोमाने परत अभ्यासाला बसता येते. निसर्ग आपल्याला सतत काम करण्याची प्रेरणा देत असतो. रोज आठ तास झोप फार आवश्यक आहे, त्यांनी थकलेल्या मेंदूस विश्रांती मिळेल. 

- स्वयंशिस्त : याला खूप महत्त्व आहे, कोणत्या वेळी, काय व किती प्रमाणात करायचे हे ठरवण्यासाठी स्वयंशिस्त आवश्यक आहे. किती तरी विद्यार्थी भरपूर वेळ टीव्ही बघत बसतात अगर मोबाईलवर गेम खेळत बसतात किंवा मित्र मैत्रिणीशी बोलत बसतात, त्यात खूप वेळ जातो. असे न करता आपल्याला आयुष्यात काय मिळवायचे आहे व कुठे पोचायचे आहे, हे ध्येय आधी ठरवले तर स्वयंशिस्त आपोआप येवू शकते. यासाठी विवेक गरजेचा आहे. स्वयंशिस्त लावून जर आपण अभ्यास केला, तर ध्येयपूर्ती सोपी होते. स्वयंशिस्तीचा   उपयोग नुसता परीक्षेपुरता मर्यादित नसून आयुष्याच्या प्रत्येक वळणार कामी येणार आहे.

- स्व-अध्ययन : यामध्ये आपण काय वाचले, कोणती उदाहरणे सोडवली, अकाउंटचे कोणते प्रॉब्लेम्स सोडवले, याचे मनन करणे, तसेच  थियरी करताना मुद्दे लिहिण्यासाठी रंगीबेरंगी पत्त्यासारखी कार्ड करून आपण कपाटावर किंवा भिंतींवर चिकटवून ठेवून रोज पाहू शकता. रंगीबेरंगी कार्ड केल्याने मेंदू व डोळे जास्त लक्षात ठेवू शकतात. धडे सतत वाचणे, मुद्दे समजण्यासाठी खूप आवश्यक असते.

सतत निरनिराळी गणिते अगर अकाउंट्सचे प्रॉब्लेम्स सोडवूनच सराव होतो. यामध्ये कच्चे काम करताना  हस्ताक्षर आणि नीट नेटकेपणा गरजेचा आहे, कारण मी जे करिन ते उत्तम करीन, याची भावना सतत ठेवायला पाहिजे. त्यामुळे आपले प्रत्येक काम गुणवत्ता पूर्ण असेल आणि गुणवत्ता कधीही तडजोड करायची नाही, याची मनाला आत्तापासून सवय लागते. आपले काम बिनचूक असावे असा निर्धार विद्यार्थ्यांनी सतत मनात ठेवावा. 

- केंद्रित दृष्टीकोन : याचा अर्थ ध्येयनिश्चिती नंतर पूर्ण लक्ष ध्येयावर ठेवून वर्तमान काळात रहाणे. अभ्यास करताना फक्त आणि फक्त अभ्यासाकडे लक्ष असावे, मनाला भूत काळात अगर भविष्य काळात भरकटू द्यायचे नाही, यामुळे आपण वाचलेले लक्षात राहील.  सतत मनावर अंकुश ठेवून त्याला परत परत वर्तमान काळात आणायचे. यामुळे खूप फायदे होतात. बाहेरच्या वेगवेगळ्या प्रलोभना पासून स्वःतला दूर ठेवता येते. ही प्रलोभने तुमच्या ध्येयात / मार्गात अडथळे आणतात.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जपानमध्ये चौथीपासून मन लावून ध्यान शिकवतात म्हणजे मनाला वर्तमानकाळात बांधून ठेवणे, ज्यामुळे अभ्यास करताना एकाग्रता वाढते, लक्षात जास्त राहते आणि स्मरणशक्ती वाढते. 
या चतु:सुत्रीचा अवलंब केल्यास यश तुमचेच आहे. विद्यार्थ्यांनो तुमच्या पंखात कर्तृत्वाचे बळ आणा आणि खुल्या निरभ्र आकाशात भरारी घ्या, जग तुमचेच आहे, यशही तुमचेच आहे. मला जी गोष्ट मिळवायची आहे त्यात कोणीही रोखू शकत नाही, हा निर्धार आता करायचा आहे.

- डॉ. चारुशीला रमेश बिराजदार
प्राचार्या, एमईएस आर्टस् आणि कॉमर्स रात्र महाविद्यालय, कर्वे रोड, पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com