Grapes
Grapessakal

रशिया- युक्रेनमधील युद्धाच्या झळा, द्राक्षाची निर्यात थंडावली

वालचंदनगर, ता.४ : रशिया -युक्रेन युद्धाचा परिणाम राज्यातील द्राक्ष शेतीवरही होण्यास सुरुवात झाली आहे. रशियाला निर्यात करणारे एक्सपोर्टर (व्यापारी) धास्तावले असल्याने द्राक्षाची निर्यात थंडावली आहे. याचा फटका द्राक्ष उत्पादकांना बसला आहे.

फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून रशियामध्ये महाराष्ट्रातील पिवळ्या रंगाच्या द्राक्षांना चांगली मागणी असते. हंगामामध्ये भारतातून सुमारे ३ हजार कंटेनर द्राक्षाची निर्यात होत असते. मार्च महिन्यापासून निर्यातीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. रशियाने युक्रेन वरती आक्रमण केल्यानंतर अमेरिका, ब्रिटनसह जगातील अनेक देशांनी रशियावर कडक निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे. याचा परिणाम भारतातील विशेषतः: महाराष्ट्रातील द्राक्ष शेतीवर होण्यास सुरवात झाली आहे. रशियावर आर्थिक निर्बंध घातल्यामुळे आंतरराष्ट्रीय बॅंकेमध्ये होणारे व्यवहार अडकण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच अनेक आंतरराष्ट्रीय बॅंकांनी रशियाला बॅन करण्याची शक्यता गृहीत धरुन छोट्या-मोठ्या निर्यात करणाऱ्या व्यापाऱ्यांनी रशियामध्ये होणारी द्राक्षाची निर्यात थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच द्राक्षाचे कंटेनर समुद्रामार्ग जहाजाने रशियामध्ये जात असतात. काही जहाजे युक्रेनजवळून काळ्या समुद्रामार्ग रशियाकडे जातात. युद्धामुळे काळ्या समुद्रातून होणारी जहाजाची वाहतूक विस्कळित झाली आहे. जहाजामध्ये कंटेनर अडकून पडण्याच्या भीतीमुळे द्राक्षे निर्यात करणारे व्यापाऱ्यांनी निर्यात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.


रशिया-युक्रेन युद्धामुळे द्राक्ष निर्यात करणाऱ्या कंपन्या धोका पत्करण्यास तयार नाही. त्यांना पैसे अडकण्याची भीती असून याचा परिणाम द्राक्षाच्या निर्यातीवर होत आहे. रशियामध्ये होणारी निर्यात कमी झाल्याचा फटका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे.
-भारत शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ

व्यापाऱ्यांकडून द्राक्षे निर्यातीस टाळाटाळ
रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम रशियाच्या चलनावरती होणार असल्याचे द्राक्ष निर्यात करणाऱ्या कंपन्यांनी गृहीत धरले. रशियन रूबल चलनाचा अवमूल्य (कमी) झाल्यास रशियामध्ये द्राक्षाचे दर वाढण्याची भीती आहे. भारतातून निर्यात झाल्यानंतर रशियामध्ये द्राक्ष पोहचेपर्यंत रशियन चलनाच्या अवमूल्यामुळे दर दुप्पट झाल्यास जहाजातील कंटेनर उतरवून न घेतल्यास मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याने व्यापारी रशियामध्ये द्राक्षे निर्यात करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष भारत शिंदे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com