16 year girl injured leopard attack junnar
16 year girl injured leopard attack junnarSakal

Pune Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात १६ वर्षांची मुलगी जखमी; पिंपळवंडीतील घटना

पिंपळवंडी (ता. जुन्नर) येथे शेतात ऊसतोडणी सुरू असताना एका १६ वर्षीय मुलीवर बिबट्याने हल्ला केला.

आळेफाटा : पिंपळवंडी (ता. जुन्नर) येथे शेतात ऊसतोडणी सुरू असताना एका १६ वर्षीय मुलीवर बिबट्याने हल्ला केला. त्यात ती जखमी झाली. ही घटना मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.

पिंपळवाडी येथील तोतर बेट मळ्यात रहात असलेले सूर्यकांत सखाराम तोतरे यांच्या शेतात मंगळवारी ऊस तोडणी चालु होती. त्यावेळी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ऊसतोडणी कामगारांसोबत असलेल्या रितू श्‍यामराव गागुर्डे (वय १६) या मुलीवर बिबट्याने अचानकपणे हल्ला केला. त्यावेळी बाजूला असलेल्या ऊस तोडणी कामगारांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने पळ काढला.

या हल्ल्यात मुलीच्या पाठीवर व डोक्यावर जखम झाली. तिला नारायणगाव येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. घटनास्थळी वन विभागाचे वैभव काकडे, संतोष साळुंखे, बी. के. खरगे, रोशन नवले यांनी भेट दिली. या ठिकाणची ऊस तोडणी तात्पुरती थांबविण्यात आली आहे.

दरम्यान, आळेफाटा परिसरातील आळे, वडगाव आनंद, राजुरी, पिंपळवंडी, चाळकवाडी, वडगाव कांदळी, बोरी, जाधववाडी या गावांमध्ये बिबट्यांचे पाळीव प्राणी, तसेच माणसांवर हल्ले दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत.

या परिसरातील नागरीकांना दिवसाही बिबट्याचे दर्शन होत आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. या परिसरातील प्रत्येक वाडी वस्तीवर वनविभागाने बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com