मशागतीच्या कामांसाठी ट्रॅक्टरसाठी १०० लिटरपर्यंत डिझेल वाहतूक, साठवणुकीस परवानगी

मशागतीच्या कामांसाठी ट्रॅक्टरसाठी १०० लिटरपर्यंत डिझेल वाहतूक, साठवणुकीस परवानगी
Published on

ट्रॅक्टरसाठी १०० लिटरपर्यंत डिझेल साठवणुकीस परवानगी
शेतकऱ्यांना आधारकार्ड, ॲग्री स्टॅक क्रमांक सादर करणे बंधनकारक
ॲग्रोवन वृत्तसेवा
.............
परभणी : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर मे व जून महिन्यात पेरणीपूर्व शेती मशागतीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू होत असल्याने शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी डिझेल उपलब्धतेत अडचणी येऊ नयेत यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मशागतीच्या कामांसाठी वापरण्यात येणाऱ्या ट्रॅक्टरसाठी एकावेळी गरजेनुसार जास्तीत जास्त १०० लिटरपर्यंत डिझेल पेट्रोल पंपावरून प्लास्टिकच्या एप्रुव्हड कंटेनरमध्ये घेऊन जाण्यास अटी व शर्तींसह परवानगी देण्यात आली आहे.
पेट्रोल पंपावरून डिझेल घेऊन जाताना शेतकऱ्यांना आधारकार्ड, ॲग्री स्टॅक क्रमांक, ७/१२ उतारा,खातेदाराचे धारणक्षेत्र दर्शविणारा नमुना ८-अ तसेच ट्रॅक्टरचे आरसी बुक सादर करणे बंधनकारक राहील.
क्लास ‘बी’ व ‘सी’ प्रकारातील इंधनाच्या वाहतूक व साठवणुकीसंदर्भातील नियमांनुसार ही परवानगी लागू राहणार आहे.प्रशासनाने जारी केलेल्या आदेशानुसार शेती मशागतीसाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या धारण क्षेत्राचा व कामाच्या गरजेचा विचार करून जास्तीत जास्त १०० लिटरपर्यंत डिझेल देण्यात येणार आहे. मात्र, हे डिझेल फक्त मान्यताप्राप्त धातूच्या किंवा जाड प्लास्टिकच्या एप्रुव्हड कंटेनरमध्येच वाहून नेता येणार असून प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये डिझेल देण्यास पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. डिझेल साठवणुकीसाठी स्टिल किंवा लोखंडी कंटेनरचा वापर करणे बंधनकारक राहील. कंटेनरमध्ये किमान ५ टक्के रिकामी जागा ठेवणे आवश्यक राहणार आहे. साठवणुकीची जागा हवेशीर असावी तसेच ज्वलनशील पदार्थांपासून दूर ठेवावी असे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित ठिकाणी ‘धूम्रपान निषेध’ व ‘आगीपासून सावध’ असे फलक लावणे आवश्यक राहणार आहे. डिझेल रिकामे करताना गळती होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. दरम्यान,पेट्रोलपंप चालकांनी एकदा डिझेल दिल्यानंतर पुढील पुरवठा किमान १५ दिवसांच्या अंतरानेच करावा असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.या प्रकारच्या विक्रीची स्वतंत्र नोंद नाव,मोबाईल क्रमांक व कारणासह ठेवणे तसेच सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित जतन करणेही बंधनकारक करण्यात आले आहे.
---
चौकट
नियम तोडल्यास कारवाई
नियमांचे उल्लंघन झाल्यास जीवनावश्यक वस्तू अधिनियमअंतर्गत संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. हा आदेश पुढील आदेशापर्यंत लागू राहणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे यांनी आदेशात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com