पुणे : कोरोना झालेल्यांवर क्षयरोगाचे सावट!

प्रतिबंधात्मक उपाय म्हणून घराबाहेर पडताना मास्क घालण्याचा सल्ला
Pune :Tuberculosis strikes corona victims
Pune :Tuberculosis strikes corona victimssakal media

पुणे : तुम्हाला कोरोना होऊन गेलाय का? उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करावे लागले होते का? कोरोनामुळे तुमच्या फुप्फुसांची कार्यक्षमता कमी झालीय का? या तीनही प्रश्नांची उत्तरे ‘हो’ असणाऱ्यांनो तुम्हाला क्षयरोगाच्या जंतूंचा संसर्गाचा धोका सर्वाधिक आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तुम्ही घराबाहेर पडताना मास्क घालाच, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

जागतिक क्षयरोग दिन येत्या गुरुवारी (ता. २४) आहे. ‘क्षयरोगाला हद्दपार करण्यासाठी गुंतवणूक करा. प्राण वाचवा’ ही या वर्षीच्या क्षयरोग दिनाची संकल्पना आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोनामुक्त रुग्णांना क्षयरोगाचा धोका असल्याची माहिती क्षयरोगतज्ज्ञांनी दिली.

कोरोनामुळे काय झाले?

कोरोनाच्या पहिल्या दोन लाटांमध्ये उद्रेक झालेल्या विषाणूंच्या व्हेरियंटने थेट मानवी फुप्फुसांवर हल्ले केले. श्वसनमार्गाच्या खालच्या भागात ससंर्गाचे प्रमाण वेगाने वाढले. त्याचा फटका फुप्फुसांना बसला. कोरोनामुळे काही रुग्णांच्या फुप्फुसांची कार्यक्षमता कमी झाली. तिसऱ्या लाटेतील ओमिक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग श्वसन मार्गाच्या वरच्या भागात असल्याने बहुतांश रुग्णांच्या फुप्फुसांना धोका निर्माण झाला नाही.

कसा वाढला धोका?

देशातील ४० टक्के लोकसंख्येला क्षयरोगाचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी काही रुग्णांचे निदान झालेले नाही. अशा क्षयरुग्णाच्या थुंकीतून जंतूंचा प्रसार होतो. कोरोनामुळे फुप्फुसाची कार्यक्षमता कमी झालेल्या रुग्णांना क्षयरुग्णांच्या संसर्गाचा धोका जास्त असतो. त्यामुळे उपचारांना मर्यादा पडतात. या पार्श्वभूमीवर कोरोनातून बऱ्या झालेल्या विशेषतः उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णांना क्षयरोगाचा संसर्ग होऊ नये, याची विशेष काळजी घ्यायला पाहिजे, अशी देशाच्या क्षयरोगाच्या पश्चिम भारताच्या कृती दलाचे अध्यक्ष डॉ. संजय गायकवाड यांनी दिली.

प्रत्येक श्वास हवा सुरक्षित

कोरोनाबरोबरच आता क्षयरोगाच्या जंतूंना प्रतिबंध करण्यासाठी आपण घेत असलेला प्रत्येक श्वास सुरक्षित पाहिजे. त्यासाठी घराबाहेर पडताना मास्क आवश्यकच आहे. मास्कमुळे क्षयरुग्णाकडून रोगजंतूंना प्रसार होणार नाही. मास्क घातलेल्या नागरिकाला रोगजंतूंचा संसर्ग होण्यापासून प्रतिबंध करता येईल, असे डॉ. गायकवाड यांनी स्पष्ट केले. माणूस प्रत्येक मिनिटाला १२ श्वास घेतो. एका तासामध्ये ७२० ते ८०० श्वास घेतला जातात. दिवसभरात १७ ते १८ श्वास माणूस घेतो. त्यामुळे प्रत्येक श्वास सुरक्षित असला पाहिजे, असा आग्रह डॉ. गायकवाड यांनी धरला आहे.

क्षयरोग आणि फुप्फुस

दिवस-रात्री कार्यरत असलेले अवयवांपैकी फुप्फुस हे एक आहे. शरीरातील प्रत्येक पेशीला ऊर्जा निर्माण करण्यासाठी आवश्यक प्राणवायू शरीरात घेण्याचे कार्य फुप्फुस करते. क्षयरोगाचे रोगजंतू श्वसनावाटे शरीरात प्रवेश करतात. त्यातून हृदयाचा धोका वाढतो.

काय केले पाहिजे?

  • प्रदूषित हवेत फिरू नका

  • गर्दीत जाणे टाळा

  • सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्कचा वापर करा

  • दीर्घ श्वसनाचे व्यायाम करा

देशाला २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी ‘राष्ट्रीय क्षयरोग मुक्त कार्यक्रम’ २०१८ पासून हाती घेण्यात आला आहे. त्याची सुरवात स्वतःपासून करायला हवी. स्वतःला क्षयरोगापासून दूर ठेवण्यासाठी काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर आपले कुटुंब, शहर, राज्य आणि अंतिमतः देश क्षयरोग मुक्त होईल.

- डॉ. संजय गायकवाड, अध्यक्ष, क्षयरोग टास्क फोर्स, पश्चिम विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com