'आरपीआय'च्या जिल्हाध्यक्षाने उकळली खंडणी; दोघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 7 October 2020

तक्रार मागे घेण्यासाठी आणि फिर्यादींची सोशल मीडियाद्वारे बदनामी थांबवण्यासाठी वाघमारे हिने दहा लाख रुपयांची खंडणी मागितली होती.

पुणे : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळातील सहायक लेखा अधिकाऱ्याकडून पाच लाख रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (ए) युवती आघाडीच्या माजी जिल्हाध्यक्षासह तिच्या चालकाला गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे.
सुप्रिया कुंडलिक वाघमारे (वय 32, रा. निंबोडी, ता. इंदापूर) असे आरपीआयच्या माजी पदाधिकाऱ्याचे नाव आहे. तिचा चालक आकाश महादेव शेलार (वय 26, रा. बारामती) याला देखील अटक करण्यात आली आहे.

प्राध्यापकांच्या प्रमोशनला 'ब्रेक'; राज्य शासनाच्या आदेशाकडे पुणे विद्यापीठाचं दुर्लक्ष

याप्रकरणी 54 वर्षीय सहायक लेखा अधिकारी यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांच्या विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्याकडे महात्मा फुले मागासवर्गीय कर्ज योजनेतील कर्ज वितरणाची जबाबदारी आहे. वाघमारे हिने फिर्यादींच्या विरुद्ध मागासवर्गीय कर्ज हमीचे पाच टक्के सहभाग आणि शासकीय हमीचे डीडी अनधिकृतपणे स्वीकारून मनमानी कारभार केल्याची तक्रार मंडळाच्या पुणे जिल्हा व्यवस्थापकांकडे केली होती. तसेच त्यांची सोशल मीडियाद्वारे बदनामी देखील केली.

'..तर आम्हालाही आत्महत्या कराव्या लागतील!'​

वाघमारे खंडणी मागत असल्याची तक्रार फिर्यादींनी पोलिस आयुक्त कार्यालयाकडे केली होती. त्यानुसार अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे यांनी याबाबतच्या सूचना गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाला दिल्या होत्या. त्यावेळी निरीक्षक अंजुम बागवान, उपनिरीक्षक विजय झंजाड, कर्मचारी मनीषा पुकाळे, शंकर पाटील, गणेश साळुंखे, सचिन ढवळे, शीतल शिंदे यांच्या पथकाने सापळा रचून खंडणी स्वीकारण्यासाठी आलेल्या आकाशला विश्रांतवाडीत असलेल्या समाजकल्याण विभागातील सहायक आयुक्तांच्या कार्यालय आवारात पकडले. त्यानंतर वाघमारे हिला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले. दोघांना दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

10 लाखांची केली होती मागणी :
तक्रार मागे घेण्यासाठी आणि फिर्यादींची सोशल मीडियाद्वारे बदनामी थांबवण्यासाठी वाघमारे हिने दहा लाख रुपयांची खंडणी मागितली होती. मात्र, तेवढे पैसे देणे शक्‍य नसल्याने फिर्यादी यांनी खंडणीची रक्कम कमी करण्याची विनंती केली होती. तडजोडी अंती मध्यस्थीमार्फत पाच लाख रुपये देण्याचे ठरले होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two arrested including former RPI office bearer for extorting Rs 5 lakh ransom