मास्क, रेनकोटचा वापर करुन 'ते' दोघं देत होते पोलिसांना गुंगारा पण...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जुलै 2020

पुणे शहरातील चतुशृंगी, येरवडा व कोरेगाव पार्क पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दुकानांचे शटर उचकटून चोरी केल्याप्रकरणी चतुशृंगी पोलिसांनी दोघांना अटक केल्याची माहिती उपायुक्त पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

औंध (पुणे) : पुणे शहरातील चतुशृंगी, येरवडा व कोरेगाव पार्क पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दुकानांचे शटर उचकटून चोरी केल्याप्रकरणी चतुशृंगी पोलिसांनी दोघांना अटक केल्याची माहिती उपायुक्त पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. विकास उर्फ जंगल्या उर्फ विकी दिलीप कांबळे (२८ वर्षे, रा. बौद्धनगर, पिंपरी) व सर्फराज उर्फ रावण ताज शेख (रा. कासारवाडी) या दोघांना गुन्ह्यात सहभागी असल्यावरुन अटक करण्यात आली. यातील विकी कांबळे हा पिंपरी चिंचवड पोलिसांच्या रेकॉर्डनुसार तडीपार आहे. शहरात मागील आठ नऊ महिन्यांत शटर उचकटून चोरी करण्याच्या घटनेत वाढ झाली होती. या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांनी वेगवेगळे पथक तयार केली होती. तपास पथकातील चतुशृंगी पोलिस ठाण्याचे कर्मचारी प्रकाश आव्हाड व तेजस चोपडे यांनी गुन्हे घडलेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासणी करुन गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार संबंधित संशयित आरोपी हे घरकूल वसाहत चिखली येथे असल्याचे कळले.

पुणेकरांनो, नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई होणार 

या माहितीच्या आधारे चतुशृंगी पोलिस ठाण्याच्या पथकाने त्यांना चिखलीतून अटक केली. सदर संशयित हे पोलिसांच्या रेकाॅर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी खून, खूनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, लूटमार, मारामारीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. चतुशृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाच, येरवडा, कोरेगाव पार्क, पिंपरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी एक याप्रमाणे त्यांनी केलेले आठ गुन्हे या पथकाने उघडकीस आणले आहेत. या गुन्ह्यांत वापरलेली चोरीची दुचाकी व रोख रकमेसह एकूण साठ हजार रुपयांचा मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आला आहे. या दोघांवर दाखल असलेल्या पिंपरी चिंचवड शहर हद्दीत शटर तोडून चोरीच्या प्रकरणांचाही तपास सुरू आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उपायुक्त पंकज देशमुख, सहायक आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या सुचनेनुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शेवाळे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) माया देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक मोहन जाधव यांच्यासह हवालदार एकनाथ जोशी, मारुती पारधी, पोलिस नाईक संतोष जाधव, प्रकाश आव्हाड, ज्ञानेश्वर मुळे, सारस साळवी, प्रमोद शिंदे, आशिष निमसे, तेजस चोपडे, वासिम सिद्दिकी, शाम शिंदे, महिला पोलिस रोहिणी पांढरकर यांनी ही कामगिरी केली. या चोरी प्रकरणातील संशयित आरोपी विकी कांबळे हा पिंपरी पोलिसांनी एका वर्षासाठी तडीपार केले आहे. तर सर्फराज शेख याच्यावर सुद्धा गंभीर गुन्हे दाखल आहेत. हे दोघेही चोरी करतांना दुचाकीचा वापर करत तसेच ग्लोव्ह्ज, मास्क, रेनकोट व टोपीचा वापर करत आपली ओळख लपवून चोरी करत होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two arrested in theft case