नारायणगाव उपबाजारात दोन गटात हाणामारी; दहा जणांना अटक

रवींद्र पाटे
Thursday, 5 November 2020

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजाराच्या आवारात बुधवारी (ता.४) रात्री सपकाळ व पवार या दोन गटात लोखंडी रॉड व काठ्याचा वापर करून तुफान हाणामारी  झाली.

नारायणगाव : पीकअप जीपमध्ये भाजीपाला भरण्याच्या वादातून जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजाराच्या आवारात बुधवारी (ता.४) रात्री सपकाळ व पवार या दोन गटात लोखंडी रॉड व काठ्याचा वापर करून तुफान हाणामारी  झाली. या प्रकरणी दोन गटातील सोळा जणांवर नारायणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यापैकी सहा जण अल्पवयीन आहेत. दोन गटातील दहा जणांना आज दुपारी अटक केली आहे.अशी माहिती नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक डी. के. गुंड यांनी दिली.

धक्कादायक! शौचास गेलेल्या महिलेची छेडछाड; आरोपीच्या हल्ल्यात गमावले डोळे

या प्रकरणी सपकाळ गटातील पप्पू भुमकर, अक्षय तलवार, रोहन सपकाळ, कुणाल जंगम यांना तर पवार गटातील साई पवार, सागर खैरे, दत्ता कराडे, नयन खैरे, विशाल पवार, बंटी खैरे (सर्व राहणार नारायणगाव, ता.जुन्नर) यांना अटक करण्यात आली आहे.या मारहाणीची व उपबाजार आवारातील भाईगिरीची परिसरात चर्चा सुरू आहे.

सहायक पोलीस निरीक्षक गुंड म्हणाले जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचा वारुळवाडी येथे उपबाजार आहे.लिलाव झाल्या नंतर भाजीपाला वाहनांमध्ये भरण्याचे काम व्यापाऱ्यांनी काही तरुणांना दिले  आहे. या कामावरून साई संदिप पवार व रोहन गणपत सपकाळ यांच्या दोन गटात बुधवारी रात्री साडेदहा वाजता बाचाबाची झाली.बाचाबाचीतून दोन गटातील सहा अल्पवयीन मुले व दहा तरुणांनी एकमेकांना लोखंडी रॉड, काठ्याचा वापर करून मारहाण केली. या प्रकरणी साई  पवार व रोहन सपकाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सहा अल्पवयीन मुलासह सोळा जणांवर गुन्हा दाखल केला असून दहा जणांना अटक केली आहे.

पाणी प्रदूषण रोखायचंय? तर तुम्हाला पुणे विद्यापीठ देणार ट्रेनिंग 

उपबजार आवारात जुन्नर,आंबेगाव, शिरूर, पारनेर, बारामती आदी तालुक्यातील शेतकरी भाजीपाला विक्रीसाठी घेऊन येतात.बाजार समितीने २५ ऑक्टोबर पासून भाजीपाला उपबजार सुरू केला आहे.भाजीपाला भरण्याच्या कामावरून काही राजकीय व्यक्तीच्या वरदहस्त असल्याने तरुणांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. उपबजारात भाईगिरी सहन केली जाणार नाही. या भाईगिरीचा बिमोड केला जाईल. या मध्ये राजकीय व्यक्तीचा हस्तक्षेप सहन केला जाणार नाही.-डी. के. गुंड, साहायक पोलिस निरीक्षक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two groups clash in Narayangaon sub-market