गाडी निघाली...पत्नीला फोन केला...अन् अश्रूंचा बांध फुटला

सकाळ वृत्तसेवा
Friday, 8 May 2020

-राजस्थानातील अडीचशे कामगारांना त्यांच्या गावी पाठविण्यात आले. 
-बिबवेवाडी पोलिसांच्या प्रयत्नातून कामगारांना मुळगावी परतण्यास मदत.

पुणे : कोरोनामुळे शहरात संचार मनाई आदेश लागू झाल्याने मागील दिड महिन्यापासून शहराच्या वेगवेगळ्या भागात विविध राज्यातील कामगार, मजूर अडकून पडले होते. शहरात विविध ठिकाणी काम करणाऱ्या राजस्थानातील अडीचशे कामगार, त्यांच्या कुटुंबीयांना बिबवेवाडी पोलिसांच्या मदतीने गुरूवारी रात्री आठ खासगी ट्रॅव्हल्समधून त्यांच्या मुळ गावी पाठविण्यात आले. गाडीमध्ये निघालेल्या अनेक कामगारांनी आपल्या घरी फोन करून आपण पुण्यातून घरी निघाल्याचे सांगितले काहींना आपल्या पत्नीशी संवाद साधताना अश्रू अनावर झाले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहराच्या विविध भागात काम करणारे व सध्या बिबवेवाडी, इंदिरानगर भागात राहणारे राजस्थानातील कामगार कोरोनामुळे मागील दीड महिन्यापासून अडकून पडले होते. त्यांना गावी जायचे होते, परंतु कोरोनामुळे प्रवास करण्यावर बंदी असल्याने, त्यांना घरी जाणे शक्‍य होत नव्हते. त्यामुळे कामगार व त्यांचे कुटुंबीय अडकून पडले होते.

दरम्यान, काही दिवसांपुर्वी राज्य सरकारने निर्बंध शिथील केल्याने या कामगारांच्या घरी परतण्याच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या होत्या. बिबवेवाडीतील सामाजिक कार्यकर्ते मेघराज राठी यांनी राजस्थानातील कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना मूळगावी पाठविण्यासाठी बिबवेवाडी पोलिसांकडे अर्ज सादर करून त्यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

- संतापजनक : पुण्यातील आयटी कर्मचाऱ्यांना 'असा' दाखवला जातोय घरचा रस्ता

बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांनी या अर्जाची पडताळणी केली. त्यानंतर संबंधीत अर्ज पुणे महानगर विकास प्राधिकरणातील पोलीस अधीक्षक सारंग आवाड, परिमंडळ पाचचे पोलीस पोलिस उपायुक्त सुहास बावचे, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांच्याकडे अर्ज सादर केले. त्यांनी कामगारांना गावी जाण्यास परवानगी दिली. 

- दारु विकत घेणाऱ्यांची चेष्टा करताय, मोबाइलवर त्यांचे फोटो काढताय...तर ही बातमी वाचाच!

गुरूवारी रात्री नऊ वाजता 245 कामगार व त्यांच्या कुटुंबांना आठ खासगी ट्रॅव्हल्समधून राजस्थानला पाठविण्यात आले. यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनील फुलारी यांनी या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून कामगारांना प्रवाशासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी आवाड, बावचे, पोलीस निरीक्षक घाडगे, पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले यावेळी उपस्थित होते.

- 'कर्जमाफीचा फायदा न मिळालेल्या शेतकऱ्यांना...'; उपमुख्यमंत्र्यांनी रिझर्व्ह बँकेकडे केली 'ही' मागणी!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two hundred and fifty workers from Rajasthan returned to their native villages