esakal | खून करून वीस दिवस पूलाच्या पाईपमध्ये मृतदेह लपविला...
sakal

बोलून बातमी शोधा

खून करून वीस दिवस पूलाच्या पाईपमध्ये मृतदेह लपविला...

खून करून वीस दिवस पूलाच्या पाईपमध्ये मृतदेह लपविला...

sakal_logo
By
नितीन बारवकर, शिरूर

शिरूर : अनोळखी तरूण मध्यरात्रीच्या सुमारास घरात घुसल्याचा राग आल्याने घरातील तिघांनी त्याला लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करीत खून केला. त्यानंतर, तब्बल वीस दिवस, एका छोट्या पूलाच्या पाईपमध्ये त्याचा मृतदेह लपवून ठेवून पुरावा नष्ट करू पाहणा-या बाप - बेट्याला स्थानिक गुन्हे अन्वेशन च्या पथकाने काल रात्री जेरबंद केले. एका अल्पवयीन मुलाचाही या गुन्ह्यात सहभाग असून, त्यालाही ताब्यात घेतले आहे. इस्लाम बिस्मील्ला सम्मानी (वय ४१) व रियाज इस्लाम सम्मानी (वय २०, दोघे रा. रांजणगाव गणपती, ता. शिरूर) यांना अटक केली असून, त्यांनी खुनाच्या गुन्ह्याची कबूली दिली असल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेशनचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी सांगितले. आशिषकुमार सुभाषचंद्रकुमार गौतम (वय २३, रा. रांजणगाव गणपती, ता. शिरूर) असे खून झालेल्या तरूणाचे नाव असून, ढोकसांगवी (ता. शिरूर) जवळील परीटवाडी परिसरात जाणा-या रस्त्यातील एका छोट्या पूलाच्या पाईपमध्ये लपविलेला त्याचा मृतदेह काल उशिरा पोलिसांनी ताब्यात घेतला. या खूनप्रकरणी आणखी एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मृत गौतम हा गेल्या १७ मे ला बेपत्ता झाला होता. याबाबत त्याचा नातेवाईक अवनीश रामब्रिश कुमार याने रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. बेपत्ता गौतम याचा घातपात झाला असावा, असा संशयही त्याने पोलिसांना भेटून व्यक्त केल्याने जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे अन्वेशनला समांतर तपासाच्या सूचना दिल्या होत्या. घनवट यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक सचिन काळे, फौजदार देशमुख; तसेच जनार्दन शेळके, राजू मोमीन, अजित भुजबळ, चंद्रकांत जाधव, मंगेश थिगळे, नंदा कदम, पुनम गुंड, मुकेश कदम या पथकाने गेल्या काही दिवसांपासून रांजणगाव परिसर, रांजणगाव एमआयडीसी व परिसरात पाळत ठेवली. यातून गौतम याचा घातपात झाल्याचे निष्पन्न झाल्यावर पथकाने संशयितांच्या हालचालींवर पाळत ठेवली.

हेही वाचा: पिंपरी : पुरातन नाणे विकणाऱ्या नऊ जणांना अटक

दरम्यान, काल रात्री घटनास्थळापासून काही अंतरावर संशयास्पदरित्या फिरत असलेल्या इस्लाम सम्मानी, रियाज सम्मानी व अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी खूनाची कबूली दिली. '१७ मे रोजी मध्यरात्री तीन च्या सुमारास मी लघुशंकेसाठी बाहेर आलो असता, आशीषकुमार गौतम हा अनोळखी तरूण थेट घरात घुसला. त्यामुळे राग अनावर झाल्याने मी मुलांना उठवून गौतमला जाब विचारला पण त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्याला मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यु झाला', असा कबूली जबाब इस्लाम सम्मानी याने दिला असल्याचे घनवट यांनी सांगितले.

हेही वाचा: पुणे : महात्मा फुले मंडईत आग