पुणे : भिडे पुलावर सेल्फी घेणारे दोघे नदीत पडून वाहून गेले

सकाळ वृत्तसेवा
Friday, 16 October 2020

शहर व खडकवासला धरण साखळी क्षेत्रात सलग दोन ते तीन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने मुठा नदीमधील पाण्यात वाढ झाली आहे. त्यामुळे तरुणांचा शोध घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

पुणे -  डेक्कन येथील भिडेपुलाजवळील नदीपात्रात मोबाईलवर सेल्फी काढण्यासाठी उतरलेले दोघेजण पाण्यात बुडाले. एका तरुणाचा पाय घसरून तो पाण्यात पडल्यानंतर त्याला वाचविण्यासाठी गेलेला त्याचा मित्रही पाण्यात पडून पाण्याच्या वेगवान प्रवाहात वाहून गेला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, अग्निशामक दलाच्या जवानांकडून रात्री उशिरापर्यंत दोघांचा शोध घेण्याचे काम सुरू होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ओम तुपधर (वय 18) व सौरभ कांबळे (वय 20, दोघेही रा. ताडीवाला रोड, पुणे स्टेशन) अशी नदीत वाहून गेलेल्या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार व सौरभ दोघेही ताडिवाला रोड झोपडपट्टीमध्ये राहतात. शुक्रवारी ओम, सौरभ व त्यांचा एक मित्र असे तिघेजण कपडे घेण्यासाठी बाजारपेठेत आले होते. तेथे कपडे खरेदी केल्यानंतर तिघेजण नदीपात्रातील रस्त्यावरून पुणे स्टेशनला जात होते. भिडे पूल व ओंकारेश्‍वर मंदिराच्या दरम्यान असलेल्या नदीपात्रातील रस्त्याच्याकडेला थांबले. त्यानंतर ओम व सौरभ हे दोघेजण नदीपात्रातील गणपती विसर्जन घाटावर सेल्फी काढण्यासाठी आले. त्यांच्या मित्राने पाण्यात उतरण्यास नकार देऊन तो नदीच्याकडेला थांबला. दोघेही त्यांच्या मोबाईलवर सेल्फी घेत असतानाच ओमचा पाय घसरल्याने तो नदीच्या पाण्यात पडून वाहू लागला. त्यावेळी त्याला वाचविण्यासाठी सौरभनेही पाण्यात उडी मारली. त्यांनी आरडाओरडा केला, मात्र पावसामुळे पाण्याच्या प्रवाहाला वेग असल्याने दोघेही जण पाण्यात वाहून गेले.

दरम्यान, दोघांचा मित्र व नागरिकांनी या घटनेची माहिती अग्निशामक दलास दिली. त्यानंतर डेक्कन पोलिस व अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोचले. जवानांकडून रात्री उशिरापर्यंत दोघांचा पाण्यामध्ये शोध घेण्याचे काम सुरू होते. शहर व खडकवासला धरण साखळी क्षेत्रात सलग दोन ते तीन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने मुठा नदीमधील पाण्यात वाढ झाली आहे. त्यामुळे तरुणांचा शोध घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. दोघांच्याही कुटुंबीय, मित्र व नातेवाईक घटनास्थळी आले होते. 

हेही वाचा :  सिगारेट ओढण्यास नकार दिल्याने जीवे मारण्याची धमकी; तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

हेही वाचा :  साधने असूनही स्मार्ट सिटी मागे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two youths drown at bhide bridge while taking selfie